एकाच वेळी दोन हजार महिलांना स्तनाच्या कर्करोगाची माहिती

Women-Breast-Cancer
Women-Breast-Cancer

येरवडा - स्तनाचा कर्करोग हा पूर्णपणे बरा होणारा आहे. वेळीच तपासण्या केल्या आणि योग्य उपचार केले, तर या आजारातून आपली सुटका होऊ शकते. या आजाराचे निदान झाल्यास घाबरून किंवा नैराश्‍यात न जाता योग्य उपचार घ्यावेत, असे डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर यांनी सांगितले. 

पुण्यातील ओवायई (ओपन युअर आईज) फाउंडेशनतर्फे प्रशांती कॅन्सर केअर मिशन आणि पॉलिकॅब केबल्स यांच्या संयुक्त विद्यमाने येरवड्यातील डेक्कन महाविद्यालयात सुमारे दोन हजार महिलांनी स्तनाच्या कर्करोगाविषयी समजून घेऊन विश्वविक्रम केला. याची नोंद गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. या वेळी डॉ. कोप्पीकर बोलत होते. 

कार्यक्रमास गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षण अधिकारी लुसिया सिनीगॅग्लियसी, प्रशांती कॅंसर सेंटरच्या लालेह बुशेरी, फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सिमरन जेठवानी, आंतरराष्ट्रीय संचालिका लीला पुनावाला, उपाध्यक्षा जानकी मल्होत्रा, सचिव रेश्‍मा सराफ, सहसचिव लतिका साकला, खजिनदार श्वेता पाटील, सपना छाजेड आदी उपस्थित होते.

कोप्पीकर म्हणाले, ‘‘स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांनी तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. घरातल्या नातेवाइकांनी त्यांना आधार दिला, तर त्यातून लवकर बाहेर पडणे त्यांना सोयीचे होते.’’

सिमरन जेठवानी म्हणाल्या, ‘‘स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती होतानाच गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन विश्वविक्रम झाले आहेत. ही बाब आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंददायी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू होती.’’

सिनिगॅग्लियसी म्हणाल्या, ‘‘जवळपास दोन हजार महिलांनी एकाच वेळी ब्रेस्ट कॅन्सरविषयी जाणून घेत जागृती केली. असा उपक्रम जगभरात पहिल्यांदाच झाला आहे. भारतीयांनी आणि त्यातही पुणेकरांनी हा विक्रम घडवून आणला.’’  कर्करोगातून बऱ्या झालेल्या पाच महिलांचे अनुभव ऐकताना अनेकींचे चेहरे भावुक झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये सुरेश जेठवानी, भरत चव्हाण पाटील, आनंद छाजेड, रविराज साकला, विनोद रोहानी यांनी परिश्रम घेतले. 

१९१९ महिलांनी केले ‘नेल पॉलिस’ 
शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि छोट्या छोट्या गटांतून महिला यामध्ये सहभागी झाल्या. दोन हजारपेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला. यामध्ये १९१९ महिलांनी एकाच वेळी गुलाबी रंगाचे नेल पॉलिस करण्याचा विक्रम केला, तर १९५६ महिलांनी एकाच वेळी कर्करोग विषयावर व्याख्यान ऐकण्याचा विक्रम नोंदविला.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com