जड वाहनांना गर्दीच्या वेळी "नो एन्ट्री'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

येरवडा - शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी शहरात जड वाहनांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा विचार होऊ शकतो. त्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सार्वजनिक वाहनांचा वापर वाहतुकीचे नियम पाळून करावा, असे आवाहन केले.

येरवडा - शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी शहरात जड वाहनांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा विचार होऊ शकतो. त्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सार्वजनिक वाहनांचा वापर वाहतुकीचे नियम पाळून करावा, असे आवाहन केले.

शास्त्रीनगर चौकात पंधरवड्यापूर्वी भाग्यश्री नायर यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीविषयी विविध उपाययोजना व्हाव्यात, या मागणीसाठी स्पंदन संस्था, खराडीतील सारनाथ बुद्धविहार, वडगाव शेरी, चंदननगर परिसरातील नागरिकांनी वेकफिल्ड चौक ते कल्याणीनगर चौकापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाच्या सांगता कार्यक्रमात डॉ. धेंडे बोलत होते. या वेळी माजी आमदार बापू पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, नारायण गलांडे, विशाखा गायकवाड, अजित पानसरे, दीपक मोहिते, मधुकर पोकळे, दिलीप देवकर उपस्थित होते.

डॉ. धेंडे म्हणाले, 'शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. नगर रस्त्यावर झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. आयटी कंपन्या व हॉटेल्समुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या रस्त्यावर ग्रेड सेपरेटर, उडाण पुलांची आवश्‍यकता आहे. नगर रस्त्यावर "आयटीएमएस' सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे.''

येरवडा ते वाघोलीदरम्यान शक्‍य तेथे ग्रेड सेपरेटर उभारावेत, मुख्य चौकात सबवे, पादचारी पूल तयार करावेत, सकाळी सात ते अकरा व सायंकाळी चार ते रात्री नऊपर्यंत डंपर, मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनांना मुख्य रस्त्यावर वाहतुकीसाठी परवानगी देऊ नये, संपूर्ण रस्त्यावर सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करावे, रस्त्यावरील अतिक्रमण, बेकायदा वाहनतळ, पथारी व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नगर रस्ता ट्रॅफिक फोरमचे निमंत्रक महेंद्र पठारे यांनी केली.

वाहतूक नियमांच्या पालनासाठी शपथ
मूक मोर्चात नागरिकांनी वाहतूक नियमांविषयीचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या; तसेच वाहतूक नियम पालन करण्याची शपथही त्यांना देण्यात आली. या वेळी नगर रस्त्यावर सुरक्षित वाहतुकीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आल्याचे स्पंदन स्वयंसेवी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: yerwada pune news heavy vehicle no entry in crowd time