सळसळत्या युवा जोशात "यिन समर यूथ समिट'ची सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

कालावधी - बुधवारपर्यंत (ता. 30) 
वेळ - सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजता 
स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर 
सुविधा - प्रवेश मोफत 

पुणे - दिग्गज व्यक्तींचा रंगलेला संवाद... त्यांनी करिअरसाठी धैर्य आणि आत्मविश्‍वास बाळगण्याचा दिलेला सल्ला... त्यातून तरुणाईला मिळालेली दिशा अन्‌ सळसळत्या युवा जोशात सोमवारी "यिन समर यूथ समिट'ची सुरवात झाली. भविष्याचा वेध घेत संधीचे सोने करून आपले करिअर घडविण्याचा गुरुमंत्र देत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी तरुणाईशी मनमोकळा संवाद साधला. 

समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या तरुणांसाठी "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजिलेल्या या परिषदेला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. या वेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत बाली आणि "यिन'चे मुख्य व्यवस्थापक (कम्युनिटी नेटवर्क) तेजस गुजराथी उपस्थित होते. 

औद्योगिक क्षेत्र असो वा राजकारण...वकिली असो वा प्रशासकीय सेवा... अशा विविध क्षेत्रांत आपण कसे घडू शकतो आणि त्यासाठी काय मेहनत घ्यावी, अशा महत्त्वाच्या टिप्स तरुण-तरुणींना या परिषदेत मिळाल्या. आपले ध्येय गाठण्यासाठी काय करावे यावर तर कोणी स्टार्टअपसाठी काय करावे? याबाबत प्रश्‍न विचारले... अन्‌ त्यांच्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देत दिग्गजांनी आपल्या संवादातून त्यांना करिअरविषयीसाठीची वाट दिली. 

राजकारण, उद्योग, मॅनेजमेंट, शिक्षण आणि प्रशासकीय विभाग अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी तरुणाईसमोर त्यांचा प्रवास उलगडला. या वेळी युवांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपले कौशल्य दाखवले. टाळ्यांचा कडकडाट आणि त्यांचे विविध कलागुण अशा उत्साही वातावरणात सायंकाळचे सत्र रंगले होते. परिषदेतला पहिला दिवस तरुणाईने "फुल टू एन्जॉय' केला. 

दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "यिन'च्या माध्यमातून या परिषदा होत आहेत. यासाठी "स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी' मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले व अभी ग्रुप ऑफ कंपनीज्‌ सहप्रायोजक आहेत. 

उज्ज्वल निकम यांचा वकिलीचा तास रंगला 
विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचा या वेळी वकिलीचा तास रंगला... दहशतवादी अजमल कसाबचा खटला असो वा कोपर्डीतील खटला... यामधील अनुभव शेअर करत निकम यांनी तरुण-तरुणींना वकिलीत "आवाजाचा तोल' कसा महत्त्वाचा आहे, याचा उलगडा केला. तसेच, भविष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे, याविषयी महत्त्वपूर्ण टिप्सही दिल्या. 

दिग्गजांच्या प्रतिक्रिया... 
"सकाळ'च्या या परिषदेतून तरुणांना दिशा मिळणार आहे. तरुणांचा देश म्हणून आज जग आपल्याकडे पाहत आहे. म्हणून मी काही करू शकत नाही आणि मी यशस्वी होऊ शकेन का, हा न्यूनगंड मनातून काढून टाकावा. आव्हान स्वीकारल्याशिवाय यश मिळत नाही. म्हणून फक्त बोलण्यापेक्षा ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. खडतर प्रवासात उभे राहण्यासाठी, नवीन स्वप्न पाहण्यासाठी आणि क्षितिज विस्तारण्यासाठी ताकद निर्माण करा. 
- उज्ज्वल निकम, ज्येष्ठ विधिज्ञ 

भारत हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे येथे उद्योजकता रुजविणे हा महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधायचे असेल तर तरुणांना उद्योगांकडे वळविले पाहिजे. आज खूपच माध्यमे तरुणांसाठी खुली आहेत. त्याचा वापर करून जागतिक बाजारपेठेत त्यांनी आपले अढळस्थान निर्माण करायला हवे. मनात इच्छाशक्ती असेल तर ते यशस्वी होतील. "यिन'ने आयोजिलेल्या या परिषदेतून हा विचार तरुणाईत नक्कीच रुजेल. 
- चकोर गांधी, मॅनेजमेंट गुरू 

यश-अपयश हा जीवनाचा एक भाग आहे. त्याला सामोरे जात आपण ध्येय गाठले पाहिजे. व्यवसाय सुरू करताना स्वत- सिद्ध करण्याची ताकद निर्माण करा आणि मेहनतीला लागा. टप्प्याटप्प्याने व्यवसाय कसा वाढवता येईल, याचा विचार करा आणि काम करा. व्यवसायात टीमवर्क महत्त्वाचे असते. त्यातून एक यशस्वी व्यवसाय उभा राहतो. हेच तत्त्व घेऊन मी व्यवसायात जम बसवू शकलो. 
- जितेंद्र जोशी, संचालक, अभी ग्रुप ऑफ कंपनीज्‌ 

ही परिषद युवकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. युवकांची ऊर्जा यात नक्कीच एकवटणार आहे. पुणे शहराला स्मार्ट सिटी म्हणून पाहताना त्यात नागरिकांचाही सहभाग असणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटीबाबत 35 लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते जाणली आहेत. स्मार्ट सिटीची माहिती तरुणांपर्यंत पोचविण्याचा आमचा उद्देश आहे. पुणे स्मार्ट सिटीकडे झेप घेताना त्यात तरुणांचा सहभाग वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 
- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी 

तरुणांमधील ऊर्जेला दिशा मिळाली तर खऱ्या अर्थाने भारत सशक्त देश बनू शकेल. देशातील प्रत्येक तरुणांमध्ये जिज्ञासू वृत्ती वाढली पाहिजे. त्यासाठी तरुण-तरुणींनी प्रशासकीय सेवेत यायला हवे. प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर जे अधिकार वापरता येतात ते चांगल्या कामासाठी वापरा. म्हणजेच देश सुधारू शकेल. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी तरुणांनीच पावले उचलायला हवीत. 
- सुनील पाटील, संचालक, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. म्हणून आज पुणे विद्यापीठ देशातील नवव्या क्रमांकाचे विद्यापीठ बनले आहे. तरुणांनी वैयक्तिक व प्रोफेशनल आयुष्याचा समतोल राखायला शिकले पाहिजे. उद्याचा भारत घडवताना स्वत-मधील उद्योजकाला वाट करून द्यावी. उद्योग क्षेत्रात आल्यावर जोखीम पत्करायचीही ताकद हवी. 
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

परिषदेत उद्या काय? 
परिषदेत मंगळवारी (ता. 29) निलया एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष निलय मेहता, सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे अध्यक्ष संतोष रासकर, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे प्रा. विजय नवले, आयटी तज्ज्ञ दीपक शिकारपूर, डिजिटल आर्ट व्हीआरईचे संचालक अजय पारगे, डॉ. एस. आर. जोग आणि दीपा जोशी यांची व्याख्याने होणार आहे, तर सायंकाळी खासदार अनिल शिरोळे, दिलीप वळसे-पाटील, श्रीरंग बारणे, सुनंदन लेले आणि सतीश देसाई यांच्या हस्ते "यूथ इन्स्पिरेटर्स ऍवॉर्ड' प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Yin Summer Youth Summit starts