अजितदादा, वळसे पाटलांचा सुस्कारा!

अजितदादा, वळसे पाटलांचा सुस्कारा!

पुणे जिल्ह्यातील पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने सरशी केली. या भाजपच्या वारूला पुणे जिल्हा परिषदेत रोखण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आल्याने अजितदादा पवार आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सुस्करा सोडला. राज्यभरात फिरलेले भाजपचे वारे पाहता पुणे जिल्ह्यातही परिवर्तन अवघड नव्हते. तरी या दोन्ही नेत्यांनी घरचा बालेकिल्ला रोखण्यासाठी कष्ट घेतले. शिवसेनेचे राज्यमंत्री यांनी पुरंदर तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या तीनपैकी तीन आणि पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकून भगव्याची जादू चालविली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरची पंचायत समिती राखत कॉंग्रेसचे नाक मुळापासून उखडणार नाही, याची काळजी घेतली.

जिल्ह्यात सर्वाधिक जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर राहिला आहे. बहुतांश पंचायत समित्यांही याच पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. बारामती, शिरूर, आंबेगाव, इंदापूर आणि दौंड या पाच तालुक्‍यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला भरभरून साथ दिली. अजित पवार, वळसे पाटील, माजी आमदार अशोक पवार, रमेश थोरात यांनी आपापल्य तालुक्‍यात एकहाती सत्ता राखली. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर राहू शकला. याउलट आमदार भाजप आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या मुलाचा पराभव झाला. कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना भोरमध्ये धक्का बसला. जुुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या भावाचा पराभव झाला. शिवेसेनेचे आमदार सुरेश गोरे यांना त्यांच्या तालुक्‍यात अपेक्षित यश मिळू शकले नाही. या चारही आमदारांसाठी ही धोक्‍याची घंटा ठरणार आहे.

बारामती तालुक्‍यातील पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकून बारामती ही पवारांचीच, हा संदेश पुन्हा गेला आहे. असा निकाल राज्यातील क्वचितच एखाद्या तालुक्‍यात लागला असेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व्होट बॅंक कायम असल्याचे यातून दिसून आले आहे. मात्र एकहाती सत्ता मिळण्यासाठी दोन ते तीन जागा कमी पडणार आहेत. त्या का कमी पडल्या, याचेही आत्मपरीक्षण पक्षाला करावे लागणार आहे. पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवार यांचाच शब्द गेली अनेक वर्षे चालत आहे. विविध उपक्रमांत जिल्हा परिषद राज्यात अग्रेसर राहिली आहे. त्याचे बक्षीस या निकालाच्या निमित्ताने मतदारांनी राष्ट्रवादीला दिले आहे.

भाजपसाठी पुणे जिल्ह्यात शिरकाव करणे अवघड होते. तरीही सत्तेचा वापर करून चांगली लढत देण्याचा पक्षाने प्रयत्न केला. बारामती तालुक्‍यात राष्ट्रवादीच्या विरोधात तगडे उमेदवार देऊन तेथील निवडणूक चुरशीची करण्याचा भाजपने प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही. भाजपला या आधी काही तालुक्‍यांत उमेदवारही मिळत नव्हते. त्यांचे कमळ चिन्ह या निवडणुकीच्या निमित्ताने वाड्यावस्त्यांवर पोचले, हीच त्यांच्यासाठी या निवडणुकीतील कामगिरी ठरली आहे. केवळ मावळ ही पंचायत समिती या पक्षाकडे राहिली आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची या निवडणुकीतील कामिगरी निराशाजनक राहिली. शिवसेना आपल्या जागांत भरघोस वाढ करू शकली नाही. कॉंग्रेससाठी मात्र ही निवडणूक निर्णायकी ठरली. जिल्ह्यातील कॉंग्रेस आधीच "आयसीयू' मधे होती. ती आता "कोमा'तही गेली आहे. शेतकरी कामगार पक्षाने पुणे जिल्ह्यात एक जागा जिंकून खाते खोलले आहे.
जिल्हा परिषदेत नवीन नेतृत्त्व तयार होण्याचेही संकेत या निकालाने दिले आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी मिळाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे चुलतनातू रोहित पवार हे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होऊ शकतात. माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनाही पदाधिकारी होण्याची संधी आहे. या निकालात शिवसेनेच्या आशा बुचके या सलग चौथ्यांथा शिवसेनेकडून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. हा देखील विक्रम त्यांनी नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com