सत्तेतील लोकांकडून राजकारणासाठी तुमचा वापर : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

"सत्तेतील असो की विरोधातील दोघेही मतांच्या राजकारणासाठी तुमचा वापर करीत आहे. वस्तुस्थिती काय आहे, हे कोणीही सांगण्यास तयार नाही. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा, बेसावध राहू नका. हे फक्त तुमच्या भावनांशी खेळून मतांसाठी वापर करीत आहे''.

- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे.

पुणे : "सत्तेतील असो की विरोधातील दोघेही मतांच्या राजकारणासाठी तुमचा वापर करीत आहे. वस्तुस्थिती काय आहे, हे कोणीही सांगण्यास तयार नाही. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा, बेसावध राहू नका. हे फक्त तुमच्या भावनांशी खेळून मतांसाठी वापर करीत आहे'', असे सांगून या हरामखोरांसाठी माझ्या महाराष्ट्रातील कोणत्याही मराठी मुलाचा बळी जाता कामा नये' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सरकारला ठणकावून सांगितले. 

"शिक्षण आणि नोकरी या विषयांवर मी काही काम करीत आहे. योग्य वेळ आली की मी हाक देईल, त्यावेळी तुम्ही या. असे सांगून ठाकरे म्हणाले. "जातीपातीवर आरक्षण देण्याऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, ही भूमिका मी पहिली मांडली. आजही माझी हीच भूमिका आहे,'' असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षाच्या वतीने कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शरद सोनावणे, पक्षाचे नेते राजन शिरोडकर, अनिल शिदोरे, वसंत मोरे, अजय शिंदे, बाबू वागस्कर, बाळा शेडगे, किशोर शिंदे, बाबाराजे जाधवराव, रूपाली पाटील आदी उपस्थित होते. ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्यातील भाजप शिवसेना सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्राचे महत्त्व या सरकारला कळालेच नाही. या राज्याचे बिहार-उत्तर प्रदेश करायचे यांनी ठरविले आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, तेच मी बोलत राहणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त माझ्या तोंडातून एकही शब्दबाहेर पडणार नाही, असेही ते म्हणाले. शिक्षण आणि नोकऱ्यांसाठीच आरक्षण हवे आहे ना. परंतु खासगी उद्योगांचा चालना देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. मग नोकऱ्यात आरक्षण कुठून मिळणार, असा प्रश्‍न करून ठाकरे म्हणाले, "गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रात किती उद्योग आले, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. तेथील नोकऱ्या कुठे गेल्या. परराज्यातील मुलांना संधी दिली गेली. त्यांची आकडेवारी का जाहीर करीत नाहीत. येथून पुढे महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगात अथवा शैक्षणिक संस्थामध्ये 80 ते 90 टक्के नोकऱ्या महाराष्ट्रातील मुलांसाठी ठेवल्या पाहिजे. तसे झाले तर आरक्षणाची गरज कोणालाही भासणार नाही.'' 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा मेळावा होत असल्याने ठाकरे आपल्या मनसैनिकांना काय गुरुमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसे फलकही शहरभर लागले होते. परंतु भाषणाच्या सुरवातीलाच ठाकरे यांनी फ्लेक्‍सचा उल्लेख करून "मी कोणताही गुरुमंत्र वैगेरे देणार नाही. गुरुपौर्णिमा आणि या मेळाव्याचा काही संबंध नाही. हा साधा मेळावा आहे. काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नव्याने करावयाच्या होत्या. तुम्हाला काही गोष्टी सांगावयाचा होत्या. त्यासाठी हा मेळावा होता.''

Web Title: You are using for politics says Raj Thackeray