मित्रा, तू सोडून गेलास अर्ध्यावर...तुझ्यासाठी पसरले होते नियतीकडेही पदर...

चिंतामणी क्षीरसागर
Monday, 27 July 2020

मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील मुलावर ऐन तारुण्यात पदार्पण होत असताना हृदयावरील शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली...मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवले...पण डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. शस्त्रक्रियेदरम्यान त्याला नशीबाने साथ दिली नाही...  

वडगाव निंबाळकर (पुणे) : मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील मुलावर ऐन तारुण्यात पदार्पण होत असताना हृदयावरील शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली...मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवले...पण डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. शस्त्रक्रियेदरम्यान त्याला नशीबाने साथ दिली नाही...  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील रणजित राजाराम गवळी (वय २०) असे या अभागी तरूणाचे नाव आहे. पुण्याजवळच्या एका खासगी हाॅस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया करतेवेळी त्याचा रविवारी (ता. २६) रात्री मृत्यू झाला. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. आई, वडील, एक भाऊ हे सर्व शेतमजुरी करून आपली उपजिविका करतात. रणजित याच्यावर दोन शस्त्रक्रिया करायच्या होत्या. त्या मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत्या. डॉक्टरांनी त्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च सांगितला. त्यासाठी मित्र परिवारासह सर्वजण धावून आले. शंभर रुपयांपासून ते पाच हजार...दहा हजार रुपयांपर्यंत एका एका मित्राने मदत केली. 

एवढ्यावर न थांबता सर्व मित्रांनी अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्याला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला. नातेवाईक, पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय व प्रशासनात कार्यरत असलेल्या व्यक्तींनीही सढळ हाताने मदत केली. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांची हार झाली अन् नियती जिंकली. रणजित याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man from Baramati dies during surgery