Pune हे लग्न जमलेय आता माझे कसे होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

तरुणीसमोरच तरुणाने लॉजवर घेतला गळफास सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील धक्कादायक घटना

Pune : तुझे लग्न जमलेय आता माझे कसे होणार

सिंहगड : तीन वर्षांपासून आपले प्रेमसंबंध आहेत. आपल्या दोघांना लग्न करायचे होते. तुझं दुसऱ्याशी लग्न जमलं आहे आता माझा जगून काय उपयोग? असे म्हणत तरुणीसमोरच तिच्या ओढणीने गळफास घेत तरुणाने आत्महत्या केली आहे.

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर ही धक्कादायक घटना घडली असून याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.साकीब लतीफ इनामदार (वय 25, रा. सर्व्हे नं 69/1, माऊली नगर,दिघी-आळंदी रोड, दिघी, पुणे.) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मृत तरुण व त्याची प्रेयसी यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी दुसऱ्या धर्मातील असून तिचे काही दिवसांपूर्वी लग्न जमले आहे. आज सकाळी साडेदहा वाजता दोघेही गोळेवाडी येथील किनारा लॉजवर आले.

तेथे दोघांमध्ये लग्नावरुन शाब्दिक वादावादी झाली. त्यावेळी तरुणाने आता तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे मी तरी जगून काय करु? असे म्हणत तिच्या ओढणीने गळफास घेतला.

घाबरलेली तरुणी खाली पळत हॉटेल मालकाकडे ओढणी कापण्यासाठी ब्लेड मागण्यासाठी गेली. त्यावेळी घडलेला प्रकार हॉटेल मालकाला समजला. तरुणी पुन्हा रुममध्ये येईपर्यंत तरुणाच गळफास लागून जीव गेलेला होता. हॉटेल मालकाने तात्काळ ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर

पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस हवालदार विलास प्रधान, पोलीस नाईक गणेश धनवे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

"एका तरुणाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती गोळेवाडी येथील हॉटेल व्यावसायिकाने दिली. संबंधित तरुणाच्या प्रेयसीचे दुसरीकडे लग्न जमल्याने तिच्या समोरच त्याने टोकाचा निर्णय घेत गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत अधिक तपास करण्याचे काम सुरू आहे."

सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.