थँक्‍सच्या बदल्यात त्याने केले हे कृत्य 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

रस्त्यात अनोळखी व्यक्तीने मदत केली म्हणून तरुणीने त्याला त्याचे थँक्‍स म्हणत आभार मानले. त्यावेळी त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे करत या तरुणीला भर रस्त्यात गालावर किस केल्याचा धक्कादायक प्रकार लष्कर अरोरा टॉवर येथे घडला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

पुणे : रस्त्यात अनोळखी व्यक्तीने मदत केली म्हणून तरुणीने त्याला त्याचे थँक्‍स म्हणत आभार मानले. त्यावेळी त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे करत या तरुणीला भर रस्त्यात गालावर किस केल्याचा धक्कादायक प्रकार लष्कर अरोरा टॉवर येथे घडला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

बालेवाडी येथे रहाणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी एका महाविद्यालयात इंजिनियरींगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. ती मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास लष्कर परिसरात अरोरा टॉवर समोरील रस्त्यावर उभी होती. तिला पत्ता सापडत नसल्याने तिने तिच्या मित्राला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला. त्यावेळी तिने तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीला फोन करण्यासाठी त्याचा मोबाईल मागितला. पत्ता विचारून तिने मोबाईल परत करताना थँक्‍स म्हणून त्याचे आभार मानले, त्यावेळी त्याने हात हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. तिनेही हात पुढे करताच त्याने तिला आचानक जवळ ओढून गालावर किस करून विनयभंग केला. या घाबरलेल्या तरुणीने त्याला बाजूला झिडकारून देऊन ती तेथून पळून गेली.

याबाबत लष्कर पोलिसांकडे तक्रार करताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार बघितला. त्याचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यावरून त्याचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक वर्षा गुरव म्हणाल्या, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, आम्ही आरोपीची शोध घेत आहोत. लवकरच त्याला अटक करू.

Web Title: Young woman in Pune Molested