आपले विचार कामातून पुढे येतात : अभिनेते अजिंक्‍य राऊत यांचे मत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

'आपले विचार आपल्या कामातून, कल्पनेतून पुढे येतात. याच कल्पनेतून आषाढी वारीच्या काढलेल्या छायाचित्रांमधून पंढरीची वेगळी छटा पाहायला मिळते, असे मत प्रसिद्ध अभिनेते अजिंक्‍य राऊत यांनी व्यक्त केले. "सकाळ सोशल फाउंडेशन' आणि 'पिक्‍सल स्कूल' यांच्यातर्फे "इंद्रायणी ते चंद्रभागा' या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते

पुणे : ''आपले विचार आपल्या कामातून, कल्पनेतून पुढे येतात. याच कल्पनेतून आषाढी वारीच्या काढलेल्या छायाचित्रांमधून पंढरीची वेगळी छटा पाहायला मिळते, असे मत प्रसिद्ध अभिनेते अजिंक्‍य राऊत यांनी व्यक्त केले. 

"सकाळ सोशल फाउंडेशन' आणि 'पिक्‍सल स्कूल' यांच्यातर्फे "इंद्रायणी ते चंद्रभागा' या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये 100 पेक्षा जास्त स्पर्धकांनी दीड हजार छायाचित्रे पाठविली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण व प्रदर्शनाचे उद्‌घाटन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी "सकाळ माध्यम समूहा'च्या संचालिका मृणाल पवार, पिक्‍सल स्कूलचे संचालक जीतेश पाटील, संचालिका मीनाक्षी पाटील उपस्थित होत्या. 

या स्पर्धेत श्रीधर पलंगे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक मुकुंद पारखे, तृतीय क्रमांक कृष्णा मसलकर यांना मिळाला. उत्तेजनार्थ प्रथम शरद पाटील, उत्तेजनार्थ द्वितीय ओंकार दामले, उत्तेजनार्थ तृतीय बक्षीस प्रणिता चासकर यांना देण्यात आले. 

राऊत म्हणाले, "जे नवीन क्षण छायाचित्रातून टिपले आहेत, यातून तुमची काल्पनाशक्ती समोर आली. आपण ज्या वातावरणात वाढतो, त्यातून आपला विचार करण्याचा दृष्टिकोन तयार होतो. तो आपल्या कामातून समोर येतो. अभिनय क्षेत्रात काम करताना "विठू माऊली' सीरिअलमध्ये विठ्ठलाची भूमिका मिळेल, असे वाटले नव्हते. पण, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवल्यास त्यामध्ये यश येते.'' 
जीतेश पाटील म्हणाले, ""प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन फोटो काढावेत, यासाठी "इंद्रायणी ते चंद्रभागा' या विषयावर स्पर्धा आयोजित केली. यामध्ये कोणत्याही अटी न घालता मोबाईलवरून काढलेले फोटोही आम्ही स्वीकारले. कलाकारांच्या कृतीला महत्त्व आहे, ती केली तरच तुमचा विकास होऊ शकतो. एका फ्रेममधून जग दाखविताना त्यामध्ये भावनेचा विचार झाला पाहिजे.'' 
सूत्रसंचालन राहुल गरड यांनी केले. 

प्रदर्शन मंगळवारपर्यंत 
'इंद्रायणी ते चंद्रभागा' छायाचित्र प्रदर्शन 
- रविवार (ता. 4) ते मंगळवार (ता. 6) 
- वेळ ः सकाळी 10 ते रात्री 8 
- स्थळ ः बालगंधर्व कलादालन 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Your thoughts come from work said actor Ajinkya Raut