तरुणाईला खुणावतेय प्रशासकीय सेवा

मीनाक्षी गुरव
सोमवार, 15 एप्रिल 2019

पदवी शिक्षणानंतर मोठ्या पगाराची नोकरी नाकारून तरुणांची पावले आता प्रशासकीय सेवेकडे वळू लागल्याचे दिसून येते. खासगी क्षेत्रात मोठे पद आणि भरगच्च पगार असताना अनेक तरुण प्रशासकीय सेवेत येत आहेत.

पुणे - पदवी शिक्षणानंतर मोठ्या पगाराची नोकरी नाकारून तरुणांची पावले आता प्रशासकीय सेवेकडे वळू लागल्याचे दिसून येते. खासगी क्षेत्रात मोठे पद आणि भरगच्च पगार असताना अनेक तरुण प्रशासकीय सेवेत येत आहेत.

उस्मानाबाद येथील संतोष राऊत सध्या राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागात सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. संतोष हे मुळात मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे त्यांनी नोकरी केली. मात्र, त्यानंतर ते स्पर्धा परीक्षेकडे वळले. ‘‘नोकरीमध्ये मन रमले नाही. पुरेसे पैसे जमा झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकडे वळलो. २००३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि सहायक संचालक म्हणून रुजू झालो,’’ असे त्यांनी सांगितले.

प्रवीण डोंगरे हे सुरवातीची काही वर्षे खासगी क्षेत्रात कार्यरत होते. पुण्यातील नामांकित महाविद्यालयातून त्यांनी पेट्रोकेमिकलमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेतले. कॅम्पस इंटरव्ह्यूमधून रायगड जिल्ह्यातील एका कंपनीमध्ये प्रॉडक्‍शन इंजिनिअर म्हणून निवड झाली. काही वर्षे तेथे काम केले. २०११ पासून त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देताना त्यांना विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्तपद मिळाले. मात्र, तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत राहिले. २०१५ मध्ये त्यांची भारतीय पोलिस सेवेत निवड झाली. सध्या ते तमिळनाडूमध्ये सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

उत्तर प्रदेशातील आलोक सिंग यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण  केले. त्यानंतर ते स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये कार्यरत होते. ते म्हणाले, ‘‘स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये असताना झारखंडमधील नक्षलग्रस्त भागात काम करीत होतो. त्या वेळी विकासातील दरी आणि विषमता जाणवली. त्यामुळे लोकांसाठी काही तरी करावे, असे वाटत होते आणि हे काम करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरवात केली. सध्या मी पुण्यात एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनमध्ये (ईपीएफओ) कार्यरत आहे. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत मला यश मिळाल्याने प्रशासकीय सेवेतील कामाची नवी संधी मिळणार आहे.’’

आपण केवळ खासगी क्षेत्रात काम करीत आहोत. समाजासाठी काहीच काम करीत नाही, हे जाणवू लागले. त्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने प्रयत्न केले आणि यशही मिळाले.
- प्रवीण डोंगरे, सहायक पोलिस अधीक्षक, तमिळनाडू

Web Title: youth are interested in UPSC to be an IAS or IPS