Pune Crime News: मेफेड्रोन अतिघातक अंमली पदार्थ विक्री प्रकरणी जुन्नर येथील तरुणाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

youth arrested in connection with sale of Mephedrone drug crime pune

Pune Crime News: मेफेड्रोन अतिघातक अंमली पदार्थ विक्री प्रकरणी जुन्नर येथील तरुणाला अटक

नारायणगाव : स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशन पथकाने येथील ओझर फाट्यावर संयुक्त कारवाई करून जुन्नर येथील वीस वर्षीय तरुणाकडून पाच ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन हा अतिघातक अंमली पदार्थ व मोटार असा ३ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Pune Crime News)

अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.या प्रकरणी मंजर बशीर खान ( वय २०, राहणार शिपाई मोहल्ला , जुन्नर ) याला मंगळवारी (ता.३) रात्री अटक केली आहे.

जुन्नर शहरातील काही तरुण या अतिघातक अंमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत. ही चिंताजनक बाब आहे. या बाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या दृष्टीने पोलीस आरोपीच्या मागावर होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारायणगाव पोलिस स्टेशन परिसरात घरफोडी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मंगळवारी रात्री पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी ओझर फाट्यावर येणार असल्याची खात्रीलायक माहिती गोपनीय बातमीदार मार्फत मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशन पथकाने नारायणगाव जवळ ओझर फाट्यावर सापळा रचला होता.रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मंजर बशीर खान हा काळ्या रंगाच्या मोटारीतुन अंमली पदार्थ विक्रीसाठी आला.पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट च्या उजव्या बाजूच्या पुढील खिश्यात प्लास्टिक च्या पुडी मध्ये पाच ग्रॅम वजनाचे चाळीस हजार रुपये किमतीचा मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ मिळून आला.

अंतरराष्ट्रीय बाजारात मेफेड्रोनची किंमत प्रती ग्रॅम आठ हजार रुपये आहे.गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ बाळगल्या प्रकरणी अधिनियम १९८५ चे कलम ८(क)२२(अ) याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी मंजर बशीर खान याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधिक्षक अंकित गोयल , अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे ,उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर विभाग मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ट पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,फौजदार गणेश जगदाळे, पाटील, पोलीस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले,दिनेश साबळे,सचिन कोबल यांच्या पथकाने केली.