
Pune Crime News : पुण्यात पोलिसांचा धाक संपला? उपआयुक्तालयापासून १०० मीटर अंतरावर फोडली वाहने
घोरपडी : वानवडी गावठाण परिसरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून वाहनांची तोडफोड केली आहे. वानवडी गावात परिमंडळ झोन ५ चे पोलीस उपआयुक्तालय कार्यालय असून त्यांच्या शंभर मीटर ही घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तीन महिन्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वानवडी गावठाणातील खालची आळी, वरची आळी परिसर तसेच शिवरकर दवाखाना परिसरात रात्री अज्ञात व्यक्तीने दुचाकी, तीनचाकी, चारचारकी अशा जवळपास ३० ते ४० वाहनांच्या काचा फोडल्या. तसेच घरांवर देखील दगड मारले आहेत. वाहनांची तोडफोड झालेल्या ठिकाणी पोलिसांनी पहाणी केली आहे, त्या परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात सर्व घटना कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमागे ४ ते ५ व्यक्तींचा हात असू शकतो. यामधील संशयित व्यक्तीची ओळख पटली असून पियुष मुरुटे (वय २२) असे त्याचे नाव आहे. या गुन्हेगारांचा शोध घेत असल्याची माहिती वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी दिली.
गावात दिवसेंदिवस अवैध धंद्याचे व रस्त्यांवर मद्यपींचे प्रमाण वाढले आहे. याचा गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता तीन महिन्यांत दुसऱ्यांदा अशी तोडफोड झाल्याने पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.
परिमंडळ झोन ५ चे पोलीस उपआयुक्तालय गावालगत आहे. तरीही अवैध धंदे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक शिल्लक राहिला नसल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.