तरुणाईकडून आनंदाचं सेलिब्रेशन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

फटाकेमुक्त दिवाळी
लक्ष्मीपूजनाला तरुणाईने "फटाकेमुक्त' दिवाळी साजरी करण्यावर भर दिला. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही युवक-युवतींनी फटाकेविना दिवाळी साजरी केली. दिवाळीला फटाके उडवून ध्वनी व वायू प्रदूषण करण्यापेक्षा अंगणात मांगल्याचे दीप प्रज्वलित करून त्यांनी दिवाळीचा उत्साह द्विगुणित केला. आपले कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवत त्यांनी लक्ष्मीपूजनाचा आनंद सेलिब्रेट केला. एकूणच यंदा तरुणांकडून फटाक्‍यांची आतषबाजी कमीच पाहायला मिळाली.

पुणे - दिवाळी पहाटचा सुरोत्सव... फराळाची जय्यत मेजवानी... सायंकाळी उत्साहात केलेले लक्ष्मीपूजन आणि मित्र-मैत्रिणींना दिलेल्या मनःपूर्वक शुभेच्छांनी तरुणाईने दिवाळीचा आनंद सेलिब्रेट केला. सळसळता जोश आणि पारंपरिक परिवेशात दिवाळीचा रंग अन्‌ जल्लोष त्यांनी अनुभवला. युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत, तर युवतींनी रांगोळ्यांच्या पायघड्यांवर मांगल्याचे दीप लावले.

लक्ष्मीपूजनाला तरुणाईने कुटुंबीयांना, नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींवर आनंदाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. संपूर्ण पारंपरिक परिवेश करून त्यांनी आपल्या आप्तेष्टांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लक्ष्मीपूजनाला अगदी पहाटेपासून युवक-युवतींच्या आनंदाला उधाण आले होते. सकाळी अभ्यंगस्नान केल्यानंतर काही तरुण-तरुणींनी दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. सुरोत्सवाचा आनंद घेत काहींनी फराळाचा आनंद लुटला. त्यानंतर ठिकठिकाणी जाऊन आणि भेटीगाठी घेत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर तरुण-तरुणींच्या गर्दीने मंदिर परिसरही फुलून गेले होते. सायंकाळी सहानंतर लक्ष्मीपूजनाचा खरा रंग बहरला होता. घराची सजावट करून दारात रांगोळी काढून आणि दिवे लावून युवतींनी प्रकाशोत्सवाचे स्वागत केले. तर युवकांनी आपल्या आप्तेष्टांना भेटवस्तू देत मांगल्याचा उत्सव साजरा केला. सायंकाळी सातनंतर घराघरांत लक्ष्मीपूजन झाले. त्यात युवक-युवतींचा सहभाग प्राधान्याने होता.

पारंपरिकतेला पाश्‍चात्त्य लुकची जोड
युवकांनी खास शेरवानी, मोदी जॅकेट आणि पॅंट-शर्ट, कुर्ता-पायजमा आणि ब्लेअर असा पेहराव केला होता. तर युवतींनी इंडो-वेस्टर्न पेहरावाला प्राधान्य दिले. काहींनी साडी, पंजाबी ड्रेस, प्लाझो-कुर्ता, अनारकली ड्रेस आणि घागरा चोलीला पसंती दिली. त्याला पारंपरिक दागिन्यांची जोडही होती. लक्ष्मीपूजनाला काहीसा हटके आणि वेगळा लुक यावर तरुणाईने भर दिला. मराठमोळी नथ तर युवतींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. "इंडो-वेस्टर्न' कपड्यांवर पारंपरिक दागिन्यांची जोड देत त्यांनी हटके लुक करण्याचा प्रयत्न केला.

सामाजिक बांधीलकी
लक्ष्मीपूजन काहीतरी खास पद्धतीने साजरा करण्यावर काहींनी भर दिला. सामाजिक बांधिलकीचा वसा जपत काहींनी गरजू लोकांना फराळ आणि दिवाळीच्या साहित्याचे वाटप केले. तर काहींनी वस्त्यांमध्ये जाऊन लोकांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.

सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरुणाईने सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाइकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, हाईक, इंस्टाग्रामवर व्हिडिओ, छायाचित्र आणि संदेश पोस्ट करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच सोशल साइट्‌सवर शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत होता. युवक-युवतींचा दिवाळीचा जोश या शुभेच्छा संदेशातून पाहायला मिळाला.

Web Title: youth celebrates Diwali