‘मराठा चेंबर’ देणार युवकांना संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

युवकांमध्ये नावीन्यपूर्ण कल्पनांची कमतरता नसते. त्यांच्या क्रियाशीलतेला वाव देण्यासाठी चेंबरने हा उपक्रम हाती घेतला आहे. युवकांनाही उद्योग जगतामध्ये काही काळ काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यातून त्यांच्या करिअरला दिशाही मिळू शकते आणि या युवकांच्या माध्यमातून चेंबरच्या तज्ज्ञांकडेही नव्या संकल्पना येऊ शकतील.
- प्रशांत गिरबाने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर

पुणे - उद्योग जगतामध्ये आपल्या क्रियाशीलतेला वाव देतानाच तेथे काम करण्याचा अनुभव देणारी संधी कोणत्याही शाखेच्या पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारक युवक- युवतींना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चर उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थ्यांना १६ प्रकारच्या उत्पादन- सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे दरवाजे खुले होणार आहेत. या एक वर्षाच्या पाठ्यवृत्तीच्या काळात विद्यार्थ्यांना विद्यावेतनही मिळणार आहे. 

पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या युवकांना चेंबरच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योग, कंपन्यांचे प्रशासन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आदी १६ प्रकारच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रांचे पर्याय युवकांसाठी खुले करण्यात आले आहेत. युवकांनी त्यांच्या क्रियाशीलतेमधून नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित प्रकल्प तयार केल्यास त्यांचे सादरीकरण सेवा-उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या संचालकांपुढे करण्याची संधीही मिळेल. याचबरोबर हे प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांना चेंबरचे पाठबळही मिळणार आहे. तसेच उद्योग क्षेत्राचे धोरण तयार करणाऱ्या शासकीय घटकांपर्यंतही त्यांना पोचता येणार आहे. 

सुमारे तीन हजारांहून अधिक कॉर्पोरेट सदस्य असलेल्या चेंबरने युवकांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात कोणत्याही शाखेच्या पदवीधर युवकांना सहभागी होता येईल. या पाठ्यवृत्तीमध्ये ग्रामीण भागातील युवकांनाही संधी मिळू शकते. 

यातून युवकांच्या कल्पनांवर आधारित ‘स्टार्टअप’ही  सुरू होऊ शकतात. 

येथे संपर्क साधावा
उद्योग क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड असणाऱ्या युवकांनी पाठ्यवृत्तीबाबत चेंबरच्या www.mcciapune.com या संकेतस्थळावर माहिती मिळू शकेल. पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २५ सप्टेंबर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Chance by Maratha Chambers