चिंता'तूर' शेतकर्‍यांना तरुणाईचा हात : तूरडाळ महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड येथे हा महोत्सव आयोजित केला आहे. त्यानंतर अहमदनगर, कोल्हापूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आदी शहरांमध्ये नियोजन करण्यात येणार आहे. शेतकर्‍याची खरेदीविना राहिलेली तुर घेऊन त्याची डाळमिलमधून डाळ करून घेऊन तुरडाळ महोत्सवात ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी : सध्याची तरुणाई सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येते. यामध्ये अनेकजण केवळ 'टाईमपास' म्हणून सोशल मीडियाकडे पाहतात. मात्र, सोशल मीडियावरील अनेक समुहांनी समाजाच्या उपयोगी पडणारे अनेक विधायक कामे करण्यास सुरवात केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामधीलच एक उदाहरण म्हणजे तुरीचा मुद्दा चांगलाच गाजत असताना, शहरी भागात राहणार्‍या किसानपुत्रांनी तुरडाळ महोत्सव भरवण्याचे ठरवले. फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या किसानपुत्रांनी भोसरीमधील इंद्रायणीनगरमध्ये रविवार (दि. 7) या दोन दिवशी पहिला तूरडाळ महोत्सव महोत्सव आयोजित केला आहे. 

शेतकरी सन्मान परिषदेचे आयोजक ब्रम्हा चट्टे यांनी सांगितले की, वस्तुतः या उपक्रमामध्ये आम्हाला फायदा तर नाही, परंतु थोडीशी झळ सोसून आम्ही शेतकऱ्यांबद्दलच्या जाणिवेतून हे करत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तीन हजार तूरडाळ विकत घेण्यासाठी बुकिंग झाले आहे. 

शेतकऱ्यांबद्दल फेसबुकवर केवळ स्टेटस टाकून आपली जबाबदारी संपत नाही, तर त्यांच्यासाठी काहीतरी प्रत्यक्षात केले पाहिजे. राजकीय पक्षांचे, कार्यकर्त्यांचेही आम्ही स्वागत करतो. शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे पैसे मिळवून देणे ही आयोजकाची जबाबदारी असणार आहे. या शर्तीवर सर्वांना आयोजनासाठी हा उपक्रम खुला आहे, असे त्यांनी सांगितले. 

"आम्ही ना शेतकरी आहोत ना व्यापारी. आम्ही फेसबुकवर शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणारे काही तरुण किसानपुत्र आहोत. शेतकर्‍यांच्या दुखाचा बाजार मांडून खूप जणांनी पैसे कमावले. हे आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही शेतकर्‍यांच्या तुरडाळ विक्रीचे आयोजन करत असल्याचेही ब्रम्हा चट्टे यांनी स्पष्ट केले. 
चट्टे पुढे म्हणाले, हा महोत्सवच मुळात पैसे कमावण्यासाठी नाही. आयोजक म्हणून आम्ही गावातील शेतकरी भावाला शहरात तुरडाळ विकण्यासाठी सहकार्य करतोय. त्याच्या पाठीमागे खंभीरपणे उभा रहाण्याचा प्रयत्न करतोय. कारण तो आमचा भाऊ परिस्थीतीने पुरता पिचलाय. त्याला उभा करण्याची नैतिक जबाबदारी आम्हीचीही असल्याचे ब्रम्हा चट्टे नमूद केले. तुम्ही हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. तुमच्या शहरात होणार्‍या तुरडाळ महोत्सावात सक्रीय सहभाग घेत डाळ विकत घ्या असे आवाहन शेतकरी सन्मान परिषदेचे निमंत्रक ब्रम्हा चट्टे यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड येथे हा महोत्सव आयोजित केला आहे. त्यानंतर अहमदनगर, कोल्हापूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आदी शहरांमध्ये नियोजन करण्यात येणार आहे. शेतकर्‍याची खरेदीविना राहिलेली तुर घेऊन त्याची डाळमिलमधून डाळ करून घेऊन तुरडाळ महोत्सवात ठेवण्यात येणार आहे. तुरडाळ महोत्सवातून विक्री करून त्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तूरडाळीची किंमत तुरीचा हमी भाव अधिक तुरीची डाळ बनवण्यासाठी होणार खर्च अधिक वाहतूक धरून ठरण्यात येणार आहे. या माध्यमातून फक्त शेतकर्‍यांना शहरात तुरडाळ विक्री करण्यास मदत करण्यात येणार असल्याचे पिंपरी येथिल शेतकरी सन्मान परिषदेचे आयोजक मोहसीन शेख यांनी सांगितले.

Web Title: youth come forward to help toor dal farmers