मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मराठा तरूणाने केली होती आत्महत्या

संपत मोरे
सोमवार, 14 जानेवारी 2019

"मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने लिहिलेली चिट्टी होती. त्यामध्ये त्यात 'नामांतर होईल असे मला वाटत नाही. म्हणून मी आत्महत्या करतोय.' अशा आशयाचा मजकूर होता.

पुणे : "मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने लिहिलेली चिट्टी होती. त्यामध्ये त्यात 'नामांतर होईल असे मला वाटत नाही. म्हणून मी आत्महत्या करतोय.' अशा आशयाचा मजकूर होता.

नामांतर लढाईतील अनेक सत्याग्रहात तो सहभागी होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतरासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्या हुताम्यांच्या नावाची  यादी लावली आहे त्यात विलास ढाणे यांचा समावेश  करावा अशी लेखी विनंती मी तत्कालीन कुलगुरू डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांना केली होती"असे डॉ बाबा आढाव यांनी सांगितले.

आढाव म्हणाले, "विलास सातारा जिल्ह्यातील जळगाव येथील शेतकरी मराठा समाजातील तरुण तो डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या समाजवादी युवक दलात काम करत होता.मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी म्हणून जी चळवळ उभा राहिली त्याचे पडसाद साताऱ्यात उमटले. तिथलेही युवक या लढाईत सहभागी झाले.विलास ढाणे हा शेतकरी कुटुंबातील मुलगा या लढ्यात आला.आईवडिलांना एकुलता एक असणारा हा पोरगा विचारांनी भारलेला.समाजवादी युवक दलाचे काम तो मनापासून करत होता. नामांतराच्या चळवळीत त्याला जे योगदान देता येईल तेवढं देत राहिला.नामांतराची चळवळ सुरू असतानाच एक दिवस मला पोलीस ठाण्यातून बोलावणं आलं.मी गेल्यावर पोलिसांनी मला सांगितलं'एका तरुणाने तुम्हाला पत्र लिहून आत्महत्या केली आहे.'तो तरुण म्हणजे विलास ढाणे होता.मराठवाडा विद्यापीठाचे नामांतराला उशीर होतोय.आजच्या परिस्थितीत नामांतर होईल असं मला वाटत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे.'या आशयाचा मजकूर त्यात होता.त्या घटनेने मी हादरून गेलो.होतो."

विलास ढाणे यांच्याबाबत त्यांचे जेष्ठ सहकारी पत्रकार विजय मांडके सांगतात, "विलास हा विचारावर ठाम असणारा आणि कृती उक्ती यात अंतर नसणारा एक सच्चा कार्यकर्ता होता.तो मराठवाडा विद्यापीठाच्या सत्याग्रहात आमच्यासोबत होता. समाजवादी युवक दलाचे वतीने सातारा ते महाडचे चवदार तळे असा लॉंगमार्च काढला होता तेव्हा विलासने खूप कष्ट घेतले होते.त्याच्या आत्मबलिदानानंतर आम्ही त्याच्या प्रतिमेचे अनावरण सातारा येथे केले तेव्हा जेष्ठ पत्रकार चंद्रकांत घोरपडे यांच्या हस्ते ते झाले.दरवर्षी नामविस्तार दिनाच्या दिवशी मला माझ्या मित्राची आठवण येते.आज त्याचे आईवडील हयात नाहीत. त्याच्या गावी त्याच  जवळचे कोणीही नाही. चुलत भाऊ आहे. त्यामुळे त्याच्या गावाकडून जर जाण्याचा योग आला तर डोळे पाण्याने भरतात.नामांतर व्हावे म्हणून जातीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या आणि या लढ्यात स्वतःचे बलिदान देणाऱ्या विलासची आठवण सर्वांनी ठेवली पाहिजे."अशा भावना मांडके यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Youth committed Suicide for Marathwada university Agitation