भरधाव दुचाकीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

डोक्‍यात हेल्मेट न घातल्याने गांधीनगर, येरवडा या मार्गावर डोक्‍यास गंभीर दुखापत झाली, तसेच छातीलाही जबर मार बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

पुणे : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीची जोरदार धडक बसून एका तरुणास आपला जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजता शास्त्रीनगर परिसरात घडली.
 
महादेव श्रीराम धुरंधर (वय 35, रा. गांधीनगर येरवडा) असे अपघातात मृत्युमखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र खरात (वय 37, रा. अंगणवाडी, बोपखेल) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खरात यांचा बुधवारी वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी ते त्यांचे मित्र धुरंधर यांच्यासमवेत दुचाकीवरून जात होते. धुरंधर हे दुचाकी चालवित होते, त्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. दहाच्या सुमारास सह्याद्री रुग्णालयासमोर त्यांची दुचाकी आली. त्यावेळी एक महिला दुचाकीवरून भरधाव वेगात आली. महिलेच्या भरधाव दुचाकीने धुरंधर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यांची दुचाकी खाली पडल्याने फिर्यादी यांना किरकोळ मार बसला. मात्र धुरंधर यांनी डोक्‍यात हेल्मेट न घातल्याने डोक्‍यास गंभीर दुखापत झाली, तसेच छातीलाही जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दुचाकीवरील महिला फिर्यादी व धुरंधर यांना रुग्णालयात घेऊन न जाता तेथून पळून गेली. सहायक पोलिस निरीक्षक आर. बी. गिरमकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth has died due to a bicycle accident in Pune