आदिवासींमध्ये प्रबोधनासाठी पायी प्रवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

हुतात्मा नाग्या महादू कातकरी या क्रांतिकारकाच्या स्मृतिदिनानिमित्त मुळशी तालुक्‍यात आदिवासी बांधवांसाठी झटणाऱ्या सचिन सदाशिवराव आकरे या तरुणाने आपल्या गळ्यात नाग्या बाबांची प्रतिमा घालीत पौड ते चिरनेर (जि. रायगड) हा 140 किलोमीटर प्रवास सलग आठ दिवसांत पायी पूर्ण केला. प्रवासात सर्व आदिवासी पाड्यांत समाजप्रबोधन केले.

कोळवण (पुणे) : हुतात्मा नाग्या महादू कातकरी या क्रांतिकारकाच्या स्मृतिदिनानिमित्त मुळशी तालुक्‍यात आदिवासी बांधवांसाठी झटणाऱ्या सचिन सदाशिवराव आकरे या तरुणाने आपल्या गळ्यात नाग्या बाबांची प्रतिमा घालीत पौड ते चिरनेर (जि. रायगड) हा 140 किलोमीटर प्रवास सलग आठ दिवसांत पायी पूर्ण केला. प्रवासात सर्व आदिवासी पाड्यांत समाजप्रबोधन केले.

चिरनेर (जि. रायगड) येथील अक्कादेवीच्या माळरानावर 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह झाला होता. यामध्ये इंग्रजांच्या गोळीबारात आठ सत्याग्रहींना वीर मरण आले होते. त्यामध्ये आदिवासी-कातकरी समाजातील नाग्या महादू कातकरी या तरुणाला हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी हा प्रवास केला. सचिन आकरे हे मूळ भूम (जि. उस्मानाबाद) या ठिकाणचे असून ते मोटार मॅकेनिक आहेत. दहा वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुळशीत आले. परंतु येथील कातकरी समाजाची परिस्थिती पाहता त्यांनी आदिवासी लोकांसाठी काम करण्याचे ठरविले. अनेक स्वयंसेवी संस्थांमार्फत मदत गोळा करून ती मदत गरजू आदिवासींकडे ते पोचवितात. त्यांनी पौडमधून आपल्या प्रवासाला 18 सप्टेंबर रोजी सुरवात केली होती. वाटेत कोळवणमार्गे राऊतवाडी (पवनानगर), औंढे, खालापूर, पोईंजे, चिंचवण, कले, साई येथे आठ दिवस आदिवासी बांधवांकडे मुक्काम करून चिरणेर येथे पोचले. वाटेत येणाऱ्या शाळा, आदिवासी पाड्यांमध्ये त्याचे स्वागत कण्यात आले. त्यांनी व्यसनमुक्ती, मुलांचे शिक्षण, बालविवाह, कागदपत्र पूर्तता, समाजाशी एकरूपता यासारख्या अनेक विषयावर आदिवासी बांधवांमध्ये प्रबोधन केले.

पुणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने ते वाम मार्गाला जात आहेत. या प्रवासामधून मी त्यांचे प्रबोधन करून त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणार आहे. दरवर्षी हा पायी प्रवास करून भविष्यात लोकसहभाग वाढवून याला आदिवासी दिंडीचे स्वरूप देणार आहे.
- सचिन आकरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Initiative For Enlightenment In Adivasi