हेल्मेटमुळे वाचला तरुणाचा जीव, पण...!

Helmet
Helmet

पुणे - लहानपणापासून विविध कामे करून शिक्षण घेणारा अक्षय एक वर्षापासून फूड कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. २१ मार्चला दुपारी साडेचार वाजता तो ग्राहकाला जेवणाचे पार्सल देण्यासाठी जात होतो.

तेवढ्यात बोट क्‍लब रस्त्यावर विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या मद्यपी दुचाकीस्वाराने त्यास जोरदार धडक दिली. हेल्मेट घातल्यामुळे अक्षयचा जीव वाचला खरा, पण त्याच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली. शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च रुग्णालयाने सांगितला आहे. पण हातावर पोट असणाऱ्या त्याच्या कुटुंबापुढे हा खर्च कसा उभा करायचा, असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे शस्त्रक्रियाही रखडल्याचे वास्तव आहे. 

अक्षय वसंत पोळके (वय २५), असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. अक्षय हा ताडीवाला रस्ता परिसरामध्ये आई, दोन बहिणी, एक भाऊ अशा कुटुंबात राहतो. आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविते. लहानपणापासून काम करून अक्षयने कसेबसे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणासाठीचा पुढचा खर्च परवडेना, म्हणून त्याने वर्षभरापूर्वी विग्गी फूड कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागला. मात्र २१ मार्चच्या अपघातानंतर सगळे चित्रच बदलून गेले. स्वतःची काहीही चुकी नसताना मद्यपी दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेमुळे अक्षयचा उजवा गुडघा व पायाला जबर दुखापत झाली. हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या कंपनीने केलेल्या थोड्या अर्थसाह्यामुळे सुरवातीचे उपचार घेता आले. पण त्याच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाने काही लाखांचा खर्च सांगितला आहे. एकीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्याचा प्रश्‍न असताना, शस्त्रक्रियेसाठीचे इतके पैसे आणायचे कुठून असा प्रश्‍न कुटुंबाला पडला आहे. त्यामुळे त्याच्या पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलली जात आहे. 

‘हेल्मेट घातल्यामुळेच आमचा अक्षय आज जिवंत आहे’, शस्त्रक्रिया केली नाही, तर त्याचा पाय निकामी होईल, त्यासाठीचा इतका खर्च कुठून आणणार,’’ असा प्रश्‍न त्‍याची बहीण अवंतिका यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com