युवकांनी संगीतातील बारकावे शिकावेत - पं. जसराज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींकडूनही त्यांनी संगीतातील बारकावे शिकावेत. तेव्हाच आपले संगीत आणखी बहरेल, अशी भावना ज्येष्ठ गायक पं. जसराज यांनी व्यक्त केली. 

पुणे - ""भारतीय शास्त्रीय संगीत हे आज जगभरात पोचले आहे. खासकरून युवा पिढी शास्त्रीय संगीत शिकण्यावर भर देत आहे. या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींकडूनही त्यांनी संगीतातील बारकावे शिकावेत. तेव्हाच आपले संगीत आणखी बहरेल,'' अशी भावना ज्येष्ठ गायक पं. जसराज यांनी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात ज्येष्ठ गायक पं. जसराज यांची वयाची 90 वर्षे झाल्याबद्दल आणि "नासा'ने एका ग्रहाला त्यांचे नाव दिले, त्याचे औचित्य साधत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते पं. जसराज यांना गौरविण्यात आले. शास्त्रीय गायक पं. सुहास व्यास यांना "संस्कृती कला जीवनगौरव' पुरस्कार आणि तबलावादक पं. विजय घाटे यांना "संस्कृती कलागौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

पं. जसराज म्हणाले, ""सन्मान हा सन्मान असतो. एवढा मोठा सन्मान, पुणेरी पगडी दिली, याचा आनंद आहे. खरोखरच "नासा'नंतर हा पहिलाच पुरस्कार आहे. पुण्यात सत्कार होणे म्हणजे सांस्कृतिक नगरीने दाद देण्यासारखे आहे. कोथरूडने माझा सन्मान केला, हे महत्त्वाचे आहे.'' 

हेही वाचा  : मृत्यू झालेल्या कर्जदाराचे कर्ज माफ

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पं. रतन मोहन शर्मा, अश्विनी भिडे-देशपांडे, संजीव अभ्यंकर, हेमंत गुजराथी, राकेश चौरसिया, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महापौर मुरलीधर मोहोळ या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने आश्‍विन अंबर्डेकर या बालचित्रकाराने रेखाटलेले चित्र पं. जसराज यांना भेट देण्यात आले. या वेळी मोहोळ यांनी महोत्सवात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमागील संकल्पना मांडली. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. 

पं. जसराज यांचा मी भक्त होतो आणि राहणारही आहे. ते उत्तमप्रकारे आजही नवी पिढी घडवत आहेत. प्रेम आणि रसिकांचा आदर त्यांच्यामध्ये नेहमीच दिसतो. मलाही रसिकांकडून असेच प्रेम आणि आदर मिळावा, ही इच्छा आहे. युवा पिढीकडून आम्ही खूप काही शिकतो. 
-पं. हरिप्रसाद चौरसिया, बासरीवादक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth should teach music lessons says pandit Jasraj