युवकांची कॅबच्या ‘करिअर’कडे पाऊले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

 नोकरीच्या तुलनेत चांगले स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे अन्‌ आर्थिक प्राप्तीही चांगली होत असल्यामुळे शिक्षित अन्‌ पदवीधर युवकांची पावले आता ‘करिअर’ म्हणून कॅबच्या व्यवसायाकडे वळू लागली आहेत. अनेक पदवीधर युवक या व्यवसायात उतरले आहेत. बेरोजगारी दूर करण्यासाठी अनेक पदवीधर तरुणांना कॅब व्यवसाय उमेद देणारा ठरला आहे.

पुणे - नोकरीच्या तुलनेत चांगले स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे अन्‌ आर्थिक प्राप्तीही चांगली होत असल्यामुळे शिक्षित अन्‌ पदवीधर युवकांची पावले आता ‘करिअर’ म्हणून कॅबच्या व्यवसायाकडे वळू लागली आहेत. अनेक पदवीधर युवक या व्यवसायात उतरले आहेत. बेरोजगारी दूर करण्यासाठी अनेक पदवीधर तरुणांना कॅब व्यवसाय उमेद देणारा ठरला आहे.

अनेक शहरांमध्ये कॅबचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. पुण्यातही सुमारे ४० हजार कॅब झाल्या असून, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. मोटार विकत किंवा कर्जावर घेऊन कॅब कंपन्यांमार्फत युवक या व्यवसायात उतरत आहेत. काही कॅब कंपन्या तर चालकांना मोटारही कर्जावर घेऊन  देत आहेत. 

पाहिजे तेव्हा व्यवसाय करता येत असल्यामुळे आणि आर्थिक प्राप्तीही चांगली होत आहे. तसेच, एकाच वेळी दोन कंपन्यांसाठीही काम करता येत असल्यामुळे युवकांची कॅब व्यवसायाला पसंती मिळत आहे. तर, ड्रायव्हिंगची आवड हा घटकही युवकांसाठी महत्त्वाचा  ठरत आहे.

याबाबत कॅबचालक विनय वाघ म्हणाले, ‘‘मी पदवीधर आहे. नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे दीड वर्षापासून कॅब व्यवसाय करीत आहे. रोज सुमारे १२ तास काम करून अडीच-तीन हजार रुपये हातात येतात. कामाचे स्वातंत्र्य असल्यामुळे स्वतःच्या काही गोष्टी तसेच कुटुंबासाठीही वेळ देता येतो.’’

कॅबचालक अजित यादव म्हणाले, ‘‘पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असूनही जॉब मिळाला नाही. त्यामुळे शिक्षणावर खर्च केलेला पैसा कॅब व्यवसाय करून भरून काढता येत आहे. शिवाय येथे काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असून, मीच माझा मालक असतो. कंटाळा आला की कॅब ॲप बंद करून निवांत होता येते. 

शिवाय दिवसभराचे पैसे रात्री अकाउंटला जमा होतात. मी दिवसभर ८ ते १० तास काम करतो, खर्च जाऊन दररोज स्वतःसाठी ९०० ते १००० रुपये शिल्लक राहतात.’’

मी काही दिवस नोकरी केली. पण, १२-१५ हजारांपेक्षा जास्त पगार मिळत नव्हता. कॅब व्यवसायाची माहिती मिळाली. त्यामुळे कर्ज काढून गाडी घेतली. सीएनजी, गाडीचा हप्ता, देखभाल-दुरुस्तीचा खर्च वजा करून दरमहा २५-३० हजार रुपये मिळतात. त्यामुळे आता एखादा पार्टटाइम बिझनेस करण्याचाही विचार करीत आहे.
- अजित शिंदे,  शास्त्र शाखेचे पदवीधर 

कॅब ड्रायव्हर व्हायचंय? मिस्ड कॉल द्या!
राज्यातील अनेक शहरांत कॅबचा व्यवसाय वेगाने लोकप्रिय होत आहे. कॅब ड्रायव्हर म्हणून करिअर करून चांगले पैसे मिळविण्याची संधी ‘एपीजी लर्निंग’ने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी इच्छुकांनी ०७९४१०५५८४५ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यावर त्यांना याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth steps towards the cab career