मोबाईल गेमने घेतला तरुणाचा बळी

पेरणेफाटा येथे मोबाईल गेममुळे महाविदयालयीन तरुणाची आत्महत्या.
पेरणेफाटा येथे मोबाईल गेममुळे महाविदयालयीन तरुणाची आत्महत्या.

कोरेगाव भीमा - पेरणे फाटा (ता. हवेली) येथील महाविद्यालयीन तरुणाने मोबाईल गेमच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दिवाकर ऊर्फ संतोष धनपाल माळी (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वाघोली येथील महाविद्यालयात तो कॉमर्स पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. मात्र, अलीकडे तो रात्र रात्रभर मोबाईलवर गेम खेळत असे. त्या नादात गेल्या दोन दिवसांपासून तो कॉलेजलाही गेला नव्हता.

खोलीत त्याच्यासमवेत आजी असे. तो गेमच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्याने आजी त्याला त्याबाबत नेहमी बोलत असे. मात्र तो दुर्लक्ष करायचा. मात्र, काल आजी गावी गेल्याने तो घरात एकटाच होता. मोबाईलवर गेम खेळून झाल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे सकाळी त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आले. मात्र, तोवर खूप उशीर झाला होता.

याबाबत लोणीकंद पोलिस तसेच नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे कागल (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले माळी कुटुंब नोकरीनिमित्त पेरणे फाटा (ता. हवेली) येथे स्थायिक आहे. वडील खासगी कंपनीत नोकरीस आहेत, तर आई गृहिणी आहे. हाताशी आलेला एकुलता एक मुलगा केवळ मोबाईलमुळे गेल्याने अंत्यविधीप्रसंगी आई व आजीचा आक्रोश हृदय हेलावून टाकत होता. दरम्यान, संतोषचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.

कोडवर्डस व "ब्लॅक पॅंथर'
घरात सापडलेल्या चिठ्ठीत "आवर सन विल शाईन अगेन', "पिंजऱ्यातील ब्लॅक पॅंथर फ्री झाला', "आता कसल्याच बंधनात राहिला नाही,' "द एंड' असा मजकूर तसेच कसलासा कोड लिहिलेला आढळला. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आहे. नेमक्‍या कोणत्या गेममुळे ही घटना घडली? याबाबत पोलिस तपास करीत आहेत. त्याच्या व्हॉट्‌सऍप व फेसबुक डीपीलाही मोबाईल गेममधील "ब्लॅक पॅंथर' या कॅरॅक्‍टरचा फोटो होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com