व्याजाच्या पैशाच्या वसुलीसाठी तरुणाला ठेवले पाच महिने डांबून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण करुन त्याला अंधाऱ्या खोलीत पाच महिने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

नारायणगाव : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण करुन त्याला अंधाऱ्या खोलीत पाच महिने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी साळवाडी (ता.जुन्नर) येथील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन जणांना अटक केली असून, आरोपींना जुन्नर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

सावकारकीच्या पैशाच्या वसुलीसाठी प्रवीण बबन जाधव (वय 29, राहणार बोरी बुद्रुक,ता.जुन्नर) याचे अपहरण करुन डांबून ठेवल्याप्रकरणी अजित बाबाजी काळे, गौतम बाबाजी काळे, बाबाजी काळे, सुनंदा बाबाजी काळे, ऋतुजा अजित काळे (सर्व राहणार साळवाडी,ता.जुन्नर) अशा पाच जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी अजित व गौतम काळे यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत घोडे-पाटील म्हणाले, काळे कुटुंबीय बेकायदेशीररित्या सावकारकीचा व्यवसाय करत आहेत. प्रवीण जाधव याने गौतम काळे याच्याकडून साडेचार लाख रुपये दरमहा दर शेकडा दहा टक्के व्याजदराने घेतले होते. यावेळी गौतम काळे याने जाधव यांची जमीन स्टॅंप पेपरवर लिहून घेतली होती. व्याजाचे पैसे न दिल्याने जमिनीचे खरेदीखत करुन देण्याचा तगादा काळे कुटुंबियाने जाधव याच्याकडे लावला होता. जाधव व्याजाचे पैसे देत नाही व जमिनीचे खरेदीखत सुद्धा करुन देत नसल्याने 31 मे 2019 रोजी नारायणगाव बसस्थानकातून जाधव याचे अपहरण करण्यात आले. त्याला साळवाडी येथील गौतम काळे याच्या घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत डांबून ठेवण्यात आले.

व्याजाच्या पैशासाठी व जमिनीचे खरेदीखत करुन देण्यासाठी गौतम काळे, अजित काळे यांच्यासह घरातील इतर सदस्यांनी जाधव याला वेळोवेळी मारहाण करुण शारीरिक, मानसिक छळ केला. याबाबतची माहिती एका व्यक्तीने घोडे पाटील यांना दिली.

घोडे पाटील यांनी घोडे पाटील यांनी सोमवारी (ता.28) रात्री छापा टाकून प्रवीण जाधव याची सुटका केली. त्यानंतर आज सकाळी जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करुन अजित व गौतम काळे यांना अटक केली. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास घोडे पाटील करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The youth was kept for five months in an attempt to recover interest money