Rahul Gandhi Pune : माझे लग्न कामाशी - राहुल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

राहुल... तुमच्यावरील बायोपिकमधील हिरॉइन कोण असेल? तेव्हा क्षणार्धात राहुल म्हणाले, ‘‘माझे लग्न कामाशी झाले आहे !’’ आणि तरुणाईने उत्स्फूर्त दाद दिली.

पुणे - राहुल... तुमच्यावरील बायोपिकमधील हिरॉइन कोण असेल? तेव्हा क्षणार्धात राहुल म्हणाले, ‘‘माझे लग्न कामाशी झाले आहे !’’ आणि तरुणाईने उत्स्फूर्त दाद दिली. राजकीय मैदान गाजवत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवेदकाच्या ‘गुगली’वर षटकार लागावला. एका प्रश्‍नाचे उत्तर देतानाच राहुल यांनी निवेदिका आरजे मलिष्काला टाळी देत कार्यक्रमात धमाल उडवून दिली. 

 राजकारणासह राजकारणापलीकडचे राहुल व्यक्त झाले ते शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून. हडपसरमधील लक्ष्मी लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाला साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. राहुल गांधी यांच्याबाबत बायोपिक करणार असल्याचे सांगत, अभिनेता सुबोध भावे यांनी व्यासपीठावर ‘एन्ट्री’ केली. त्यानंतर ‘राहुलजी, लोक म्हणतात मी तुमच्यासारखा दिसतो,’ असे भावे म्हणाले. त्यावरून त्यांची फिरकी घेत, ‘तसे नाही, उलट आहे. मीच तुमच्यासारखा दिसतो,’ असे सांगून राहुल यांनी आपल्यातील हजरजबाबीपणा दाखविला.

रक्षाबंधनावरून भावूक होत राहुल म्हणाले, ‘‘जोपर्यंत राखीचा धागा तुटत नाही, तोपर्यंत मी राखी सोडत नाही.’’ बहीण प्रियंका यांच्यासोबत भांडणे होतात का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘आता भांडणे होत नाहीत. मात्र, पूर्वी व्हायची. ती मला गोड पदार्थ देऊन, लठ्ठ व्हावे यासाठी भांडायची.’’ कठीण काळात मला बहिणीची सोबत होती. ती माझी चांगली मैत्रीण आहे, आमचे खूप घट्ट नाते आहे, त्यामुळे भांडणात कधी ती माघार घेते तर कधी मी, असेही त्यांनी सांगितले.

लहानपणीची आजीची आठवण राहुल यांनी सांगितली. आजी घरी यायच्या वेळी मी पडद्यामागे लपत असे आणि ती घरात येताच एकदम पुढे येत असे. गंमत म्हणजे आजीला हे सगळं माहीत असायचं; पण ती माहीत नसल्याचं दाखवून यात नेहमी सहभागी व्हायची, अशी आठवण त्यांनी जागवली. 

एन. ईशा या विद्यार्थिनीने राजकारणातील महिलांचे स्थान याबाबत विचारले असता, राहुल यांनी तिला ‘तुम्हाला राजकारणात रस असेल तर सांगा, तुम्हाला खासदार किंवा आमदार करू,’ असे सांगितले.

मोदी मोदी घोषणा
मी मोदींवर प्रेम करतो पण ते माझा द्वेष करतात असे राहुल यांनी सांगताच सभागृहात ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा घुमल्या. यावर या घोषणांनी मला काही फरक पडत नाही, असे राहुल यांनी सांगताच घोषणा थांबल्या. 

रॅपिड राउंड
 आवडलेला चित्रपट?  बऱ्याच महिन्यांत चित्रपट बघितलेला नाही.
  आजचा नाश्‍ता?
    टोस्ट
  शॉवर सिंगर आहात?
    नाही. मी फार वाईट गातो.

Web Title: Youthful Spontaneous Response