हुंडा घेणार नाही अन्‌ देणारही नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

लातूरच्या शीतल वायाळ या तरुणीने हुंड्यामुळे आत्महत्या केली. समाजात अशा घटना दररोज घडत असून, अनेक तरुणींना आपले जीव गमवावे लागत आहेत.

पुणे : "हुंडा घेणाऱ्यांचा धिक्कार असो', अशी घोषणा देत तरुणाईने हुंडा प्रथेविरोधात एल्गार पुकारला. "हुंडा घेणार नाही अन्‌ देणारही नाही,' अशी शपथ घेत त्याबाबतच्या हमीपत्रावर सह्या केल्या आहेत. तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्याची चोख अंमलबजावणी करून हुंडाबंदी अधिकारी नेमावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. हुंडाबंदीसाठी हे तरुण जूनमध्ये "हुंडा रवंथ परिषद' आणि जुलैमध्ये पुणे ते लातूर परिवर्तन यात्रा आयोजित करण्यात येणार आहेत.

लातूरच्या शीतल वायाळ या तरुणीने हुंड्यामुळे आत्महत्या केली. समाजात अशा घटना दररोज घडत असून, अनेक तरुणींना आपले जीव गमवावे लागत आहेत. या प्रथेविरोधात एल्गार पुकारत विविध सामाजिक संस्थांमधील सुमारे 30 तरुण-तरुणींनी एक उपक्रमही हाती घेतला आहे. त्याअंतर्गत विविध प्रबोधनपर कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

सचिन आशा सुभाष म्हणाला, ""अनेक तरुणींना हुंड्यामुळे आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे राज्यात "हुंडा प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती होण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम राबविणार आहोत. यात महाविद्यालयीन आणि सामाजिक संस्थांमधील तरुण-तरुणी सहभागी होणार आहेत.'' आयेशा सय्यद आणि श्रद्धा रेखा राजेंद्र म्हणाल्या, ""फार पूर्वीपासून आपल्याकडे हुंडा घेण्याची प्रथा सुरू आहे. यामुळे मुलीच्या पालकांना खूप अडचणी सहन कराव्या लागत आहेत. या छळामुळे मुली आपला जीव संपवतात. अशा प्रथा थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. खासकरून मुलींनी पुढे येऊन हुंडा घेणाऱ्या मुलांविरुद्ध आवाज उठवायला हवा.''

Web Title: youths vow to stop dowry