युतीची सत्ता पुन्हा अशक्‍य - आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

पुणे - राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकी-तील निकाल विरोधात गेले आहेत. त्यामुळे यापुढे भाजप-शिवसेना युतीची सत्ता येईल, असे चित्र दिसत नाही. दरम्यान, चौंडीतील सभेत धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करून गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे न घेतल्यास १० जूनपासून राज्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्‍वासन दिले होते; परंतु चार वर्षे उलटूनही आरक्षण मिळाले नाही. नगर जिल्ह्यातील चौंडी येथील सभेत धनगर समाजाला आरक्षण कधी देणार?, असा जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. डॉ. भिसे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येत आहे. या वेळी भटक्‍या विमुक्‍त समाजाचे नेते लक्ष्मण माने, विजय मोरे, नवनाथ पडलकर उपस्थित होते. 

राष्ट्रवादी हा भाजपचा मित्रच
धनगर समाज पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होता. सध्या भाजप हा राष्ट्रवादीला हाताशी धरून धनगर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच, राष्ट्रवादी हा भाजपचा मित्रच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

आर्थिक निकषांवर आरक्षण नको
आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी चुकीची आहे. संविधानानुसार आरक्षणाचे धोरण एकदा ठरलेले असताना त्याला आव्हान देणे म्हणजे त्यावर घाला घालण्यासारखे आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण मागणी करणारे गेले खड्ड्यात, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. तसेच, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत, तर ते शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या मंडळींचे नेते असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Yuti BJP Shivsena politics Prakash Ambedkar