रंगणार ‘युवा मराठी साहित्य संमेलन’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पुणे - विद्यार्थ्यांच्या ‘अग्निपंख’ या संस्थेतर्फे दोनदिवसीय ‘युवा मराठी साहित्य संमेलन’ होत आहे. त्याचे उद्‌घाटन दिग्दर्शक दक्षिणकुमार बजरंगी यांच्या हस्ते २३ जानेवारीला घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात सकाळी दहा वाजता होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वीरा राठोड यांची निवड केल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष संकेत पडवळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

या संमेलनात होणाऱ्या विविध विषयांवरील परिसंवादात ‘साम वाहिनी’चे संपादक संजय आवटे, पत्रकार प्रशांत पवार, डॉ. मनोहर जाधव, ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. यादरम्यान कविसंमेलनही होणार आहे. त्याचे अध्यक्षपद प्रतिमा इंगोले सांभाळणार आहेत. यात राज्यभरातील ३२ कवी-कवयित्री भाग घेणार असून, हे या संमेलनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. 

विविध स्तरांवरील साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या मान्यवरांचे सत्कारही होणार आहेत. लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलशाने संमेलनाचा समारोप होणार आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांचेही तरुणाईला मार्गदर्शन लाभेल.

प्रश्‍नांना भिडण्याचा प्रयत्न
विद्यार्थ्यांचा साहित्यातील सहभाग वाढवून, त्यांनी साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित समाजाच्या प्रश्‍नांना पुढे आणावे, या उद्देशाने विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘अग्निपंख’ ही संस्था नुकतीच स्थापन केली आहे. संमेलनाच्या सुरवातीला ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, त्याचे उद्‌घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी करणार आहेत. 

Web Title: yuva marathi sahitya sammelan