युवा स्पंदनवर राजस्थानची छाप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - महाराष्ट्रासह चार राज्यांतील विद्यापीठांच्या युवा स्पंदन या स्पर्धेत ठसा उमटवत राजस्थानमधील वनस्थळी विद्यापीठाने पाचही कलाप्रकारांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद, तर मुंबईतील श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठाने उपविजेतेपद पटकावले. ही दोन्ही महिला विद्यापीठे आहेत. 

पुणे - महाराष्ट्रासह चार राज्यांतील विद्यापीठांच्या युवा स्पंदन या स्पर्धेत ठसा उमटवत राजस्थानमधील वनस्थळी विद्यापीठाने पाचही कलाप्रकारांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद, तर मुंबईतील श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठाने उपविजेतेपद पटकावले. ही दोन्ही महिला विद्यापीठे आहेत. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेला ३४ वा पश्‍चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव अर्थात ‘युवा स्पंदन’ गेले चार दिवस सुरू होता. या स्पर्धेचे पुरस्कार वितरण रविवारी झाले. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सतीश आळेकर, भारतीय विद्यापीठ संघाचे प्रतिनिधी डॉ. सुरिंदर मोहन कांत, प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी डॉ. अतुल पाटणकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि महोत्सवाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. विलास उगले, डॉ. महेश अबाळे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर आदी या वेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना गौरविण्यात आले.

डॉ. आळेकर म्हणाले, ‘‘महाविद्यालयीन जीवन हे आपला छंद आवडीपुरताच मर्यादित ठेवायचा, की प्रोफेशन म्हणूनही तो स्वीकारायचा, हे ठरविण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरतो. जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात, की ज्या वेळी आपल्याला छंद की प्रोफेशन यापैकी एका गोष्टीची निवड करावी लागतो. असे महोत्सव हे आपल्याला आतला आवाज ओळखण्यासाठीची संधी देतात. त्या आधारे योग्य तो निर्णय घ्यावा.’’

असा आहे निकाल
    सर्वसाधारण विजेतेपद : वनस्थळी विद्यापीठ, राजस्थान
    उपविजेतेपद : एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई
    ललित कला विभाग विजेतेपद : एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई
    नाट्यकला विभाग विजेतेपद : वनस्थळी विद्यापीठ, राजस्थान
    साहित्य विभाग विजेतेपद : वनस्थळी विद्यापीठ, राजस्थान
    नृत्यकला विभाग विजेतेपद : एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई
    संगीतकला विभाग विजेतेपद : वनस्थळी विद्यापीठ, राजस्थान

विद्यार्थ्यांसाठी विशेष पुरस्कार
डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘विद्यापीठातर्फे यापुढे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाच्या स्थापनादिनी विशेष पुरस्कार दिले जातील. विद्यापीठाच्या जीवनसाधना गौरव पुरस्काराप्रमाणेच हे पुरस्कार असतील. तसेच, विद्यापीठामध्ये ‘फाइन आर्टस अँड डिझायनिंग स्कूल’ व ‘लिबरल आर्टस स्कूल’ उभारण्यात येईल.’’

Web Title: Yuva Spandan Rajasthan Win