‘युवा स्पंदन’मध्ये कलाविष्कारांची लज्जत 

‘युवा स्पंदन’मध्ये कलाविष्कारांची लज्जत 

पुणे - महाराष्ट्राची परंपरा असलेले दिंडी नृत्य, राजस्थानच्या मातीचा सुरेल गंध पसरविणारा राग मांड यांसह डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या लोकनृत्यांचे नानाविध आविष्कार... अभिजात संगीताची मेजवानी... साहित्यावरील चर्चासत्रे अन्‌ छायाचित्रणातून बोलणारे अनोखे विषय अशा मनोहारी कलाविष्कारांची लज्जत ‘युवास्पंदन’मध्ये विद्यार्थ्यांनी घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, राजस्थान या चार राज्यांचा युवा महोत्सव सुरू आहे.

नयनमनोहारी दिंडी नृत्य 
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या नामाचा गजर, ज्ञानदेव-तुकारामाचा जयघोष, टाळ-मृदंगांचा निनाद आणि नृत्याविष्कारातून उभे केलेले विठोबा रखुमाई या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. अभंगाच्या सुरावटींचा आधार घेत नृत्यांची केलेली रचना, विद्यार्थ्यांमधील अचूक समन्वय दाखवत केलेल्या दिंडी नृत्याला विद्यार्थ्यांना उभे राहून टाळ्यांचा कडकडाटात दाद दिली. 

पधारो म्हारे देस...
राजस्थानमधील वनस्थळी विद्यापीठाने मांड रागातील ‘केसरिया बालम पधारो म्हारे देस’ ही रचना आणि पारंपरिक लोकगीतांवर केलेल्या नृत्यरचनेलाही वाहवा मिळाली. महाराष्ट्रातील अदिवासी नृत्यासह राजस्थान, गुजरात येथील पारंपरिक लोकनृत्याने रसिकांना खिळवून ठेवले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) यांसह युनिव्हर्सिटी ऑफ कोटा (राजस्थान), सौराष्ट्र विद्यापीठ (गुजरात) आदी विद्यापीठांतील कलाकारांनी लोकनृत्यांद्वारे परंपरेची ओळख करून दिली.

प्रश्नमंजूषेचा प्राथमिक निकाल
प्रश्नमंजुषेच्या प्राथमिक फेरीत अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या विद्यापीठांची नावे गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ, महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा, सरदार पटेल विद्यापीठ, आनंद (गुजरात), वनस्थळी विद्यापीठ (राजस्थान), गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद (गुजरात) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठांचा समावेश असल्याची माहिती महोत्सवाच्या संयोजन समितीचे सचिव डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.

देशी वाद्यांबरोबर विदेशी बॅंडही! 
मयूर बोरसे
पुणे : युवा स्पंदन महोत्सवात भारताबाहेरील विद्यार्थ्यांचा स्वर गुंजणार आहे. गुजरातमधील पारुल विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या झिम्बाब्वे या देशातील विद्यार्थी त्यांच्या देशातील संगीताची ओळख ‘बॅंड’द्वारे करून देणार आहेत. रॉडनी चिरिट्‌झा म्हणाला, ‘‘सांस्कृतिकनगरी अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात येऊन कला सादर करण्याचा आनंद काही औरच असणार आहे. थंडीचा आनंद घेत कला सादर करण्याचा आनंद घेता येणार आहे. थिऑफिलस मकाझे याने, उत्साहपूर्ण वातावरणात सादरीकरण करायला मिळणार असल्याचे समाधान व्यक्त केले.

संगीताची अभिजात साक्ष
पाश्‍चात्त्य शैलीचे अनुकरण करणारी तरुणाई, अशी टीका पचविणाऱ्या आताच्या तरुण पिढीमध्ये अभिजात संगीत किती भिनलेय, हे पंडित भीमसेन जोशी स्वरमंचात आज अनुभवायला मिळाले. व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या सभागृहात भारतीय शास्त्रीय गायनाबरोबरच कर्नाटक शास्त्रीय गायनाची सुरेल मैफल रंगली. प्रत्येक कलाकाराला आठ ते दहा मिनिटांचा वेळ सादरीकरणासाठी दिला जात होता. या वेळेतही कलाकार निरनिराळ्या घराण्यांची गायकी सादर करताना त्यांनी ‘बागेश्री’, ‘यमन कल्याण’, ‘पूरिया धनश्री’ हे राग सहजतेने खुलवत नेले.

ऑन द स्पॉट अन्‌ नाट्य
सामाजिकसह विविध विषयावरील नाटिका सादर करून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर्स एज्युकेशन (गुजरात), गुजरात टेक्‍नॉलॉजीकल युनिर्व्हसिटी, एसएनडीटी महिला विद्यापीठ (मुंबई) अशा विद्यापीठातील कलाकारांनी दाद मिळविली. ‘स्पॉट फोटोग्राफी’त विद्यार्थ्यांना ‘ह्युमन’ हा विषय दिला होता. यात जवळपास २०हून अधिक विद्यार्थ्यांनी ‘ऑन द स्पॉट’ छायाचित्रण करण्याचा आनंद लुटला. याबरोबरच रांगोळी स्पर्धादेखील झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com