सासवडला स्वच्छतेत `झिरो लँड फिल`ची संकल्पना

श्रीकृष्ण नेवसे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

 येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व व्यावसायिक मालमत्तेतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे शंभर टक्के संकलन, वाहतुक व वर्गीकरण करताना आता पुढचा टप्पा हाती घेतला.

सासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व व्यावसायिक मालमत्तेतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे शंभर टक्के संकलन, वाहतुक व वर्गीकरण करताना आता पुढचा टप्पा हाती घेतला. त्यातून सर्व प्रकारच्या कचऱ्याची शास्रोक्त पद्धतीने प्रक्रीयेव्दारे विल्हेवाट लावण्याचा मुख्य गाभा `झिरो लँड फिल`मध्ये आहे. 

सासवड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण - 2018 च्या अनुषंगाने विविध उपक्रम यशस्वी केल्याने.. पालिकेस यंदाचे देशपातळीवरील पश्चिम विभागातील `नाविन्यपूर्ण उपक्रम व उत्कृष्ट कार्यशैली` प्रकारातील प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळालेच आहे. आता पुढच्या वर्षाकरीताही स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यातून आणखी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे आज `सकाळ` शी बोलताना पालिका मुख्याधिकारी विनोद जळक म्हणाले. 

सासवड नगरपालिकेने स्वच्छतेच्या आघाडीवर आता झिरो लॅंड फिल ही संकल्पना राबविली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा `लॅन्डफिल`मध्ये (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) जाणार नाही., अशी ही योजना आहे. सर्व प्रकारच्या कचऱ्याची शास्रोक्त पद्धतीने शंभर टक्के विल्हेवाट लावण्याचा ही योजना आहे. घरोघरचा व व्यावसायिक ठिकाणाहून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे मुळात वर्गीकृत संकलन केले जातेच. त्यातून ओल्या कचऱ्यावर कंपोस्टिंग प्रकियेद्वारे खत तयार करण्यात आले  आहे. तर सुक्या कचऱ्याचे वेगवेगळ्या घटकांमध्ये.. जसे की प्लास्टिक, रबर, लेदर, काच, घरगुती घातक कचरा, कापड, बांधकामचा कचरा.. आदींमध्ये वर्गीकरण करण्यात येते. कचरा वर्गीकृत केल्यानंतर त्या कचऱ्यामध्ये दुबार प्रक्रिया करून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येते आहे. एकूण निर्माण होणारा ओला कचरा ७.३ टन व सुका कचरा ५.२ टन आहे. यामध्ये बांधकामाचा कचरा ५०० किलो प्रती दिन निर्माण होतो, तर घरगुती घातक कचरा अल्पशा प्रमाणात निर्माण होतो. प्रक्रियेअंती कोणताही कचरा शिल्लक राहत नाही. म्हणजे कचऱ्याची शून्य पातळी होते. `लॅण्डफिल`ला कोणताही कचरा जात नाही. त्यामुळे आता सासवड नगरपालिकेने झिरो लॅण्डफिल या पातळीची अंमलबजावणी केली आहे.

- चौकट
घरगुती प्रक्रीयेलाही वाव.. 

इथला काही कचरा वेचकांचा.. घनकचरा व्यवस्थापन प्रक्रीयेत `अोळखपत्र व रोजगार` देऊन समावेश करण्याचा प्रयोगही मध्यंतरी राबविला. कचरा संकलनात पालिकेचे 20 कर्मचारी व कंत्राटी 45 मजूर आहेत. कचऱयाचे कंपोष्ट खत होण्यास बायो कल्चरव्दारे 21 दिवस लागतात. या केंद्राशिवाय विविध उद्यानांत कंपोष्ट खत प्रक्रीया पीटही केलेत. नागरीकांनीही घरगुती पध्दतीने परसबागांसाठी खत खड्डे करावेत, त्यासाठी पालिका आवाहन करीत आहे. त्यालाही प्रतिसाद वाढत आहे. आता झिरो लॅण्डफिल ने पर्यावरण सुरक्षितेत भर पडताना.. पुढील `स्वच्छ सर्वेक्षण - 2019` मध्ये पुन्हा देशात चमकण्याची संधी आली आहे.

Web Title: zero land fill concept implemented in saswad for cleanliness