सावलीही जेव्हा साथ सोडते...

सावलीही जेव्हा साथ सोडते...

पुणे - घड्याळात दुपारचे १२ वाजून ३१ मिनिटे झाली आणि पुणेकर मिनीटभरासाठी जाग्यावर थांबले... आपले डोळे जमिनीकडे लावून सावली शोधू लागले... त्यासाठी कोणी घराच्या गच्चीवर गेले... तर कोणी रस्त्यावर उतरले... सुटी ‘एन्जॉय’ करीत असलेल्या शाळकरी मुलांनीही या घटनेचा आनंद घेतला.

सध्या सूर्य उत्तरेला प्रवास करीत आहे. त्याला उत्तरायण म्हणतात. कर्कवृत्तापर्यंत सूर्य हा प्रवास करतो. त्यानंतर पुन्हा दक्षिणायन सुरू होते. सूर्य ज्या ज्या अक्षांशावरून प्रवास करीत पुढे जातो त्या त्या अक्षांशावरील गावांमध्ये-शहरांमध्ये बरोबर दुपारी बारा वाजता सूर्य डोक्‍यावर म्हणजे ख-मध्य बिंदूवर येतो. तो दिवस त्या गावासाठी ‘झीरो शॅडो डे’ असतो. पुणे १८.५ अक्षांशावर आहे. सूर्याने मंगळवारी या अक्षांशावरून प्रवास केला. आजच्या दिवशी सूर्य बरोबर आपल्या डोक्‍यावर होता. त्यामुळे दुपारी बारा वाजून ३१ मिनिटांनी आपली सावली आपल्याला दिसली नाही. या भौगोलिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी पुणेकर मोठ्या उत्साहाने जागोजागी थांबले होते. रस्त्याच्या कडेने चालताना, सोसायटीच्या पार्किंगमध्ये, टेरेसवर अशा सर्व ठिकाणी ही गंमत पुणेकर अनुभवत असल्याचे चित्र दिसले.

लहान-थोरांनी अनुभवली गंमत
ज्योतिर्विद्या परिषदेतर्फे टिळक स्मारक मंदिरात ‘झीरो शॅडो डे’चे निरीक्षण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. संस्थेचे सदस्य याची भौगोलिक माहिती नागरिकांना देत होते. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) मुलांनी हा आगळावेगळा अनुभव घेतला. येथे जमलेल्या मुलांनी निरनिराळ्या आकार व उंचीच्या वस्तू वेगवेगळ्या पातळ्यांवरील पृष्ठभागावर ठेवत सावली गडप होण्याची गंमत अनुभवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com