Video : ‘झोमॅटो’चे डिलिव्हरी बॉय संपावर

Zomato delivery boy on strike
Zomato delivery boy on strike

औंध - ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. 

पुणे व पिंपरी चिंचवडमधील जवळपास पाचशे कर्मचारी झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयासमोर सोमवारी जमा झाले होते. शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, निगडी येथील बहुसंख्य डिलिव्हरी बॉइजनी(रायडर्स) ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीचे काम थांबविल्याने झोमॅटोची सेवा विस्कळित झाली होती. झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयातील व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे अतुल डोके या तरुणाने सांगितले. 

कंपनीने अचानक दरपत्रक बदलून पुरवठा दर (डिलिव्हरी चार्ज) कमी केले असून, पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधन, मल्टी ऑर्डर यासारख्या बाबींविरोधात आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती. यावर निर्णयासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु तेवढ्या कालावधीत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप पुकारल्याचे संपाचे समन्वयक झेड. अप्पासाहेब यांनी सांगितले, तर कंपनीने कर्मचाऱ्यांनी समस्या कुणाकडे मांडाव्यात यासाठी व्यवस्थापकाची नियुक्तीसुद्धा केलेली नाही. यामुळे अडचणी कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न असल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले.

व्यवस्थापनाचे अधिकृत म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.  डिलिव्हरी बॉय असलेले बरेच तरुण हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले आहेत. यातील अनेक जण शिक्षण घेत पार्ट टाइम झोमॅटोचे काम करतात. 

काय आहेत मागण्या?  
सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात तसेच लांबचे पिकअप व ड्रॉप देऊ नयेत. जुन्या व ज्यांना कामावरून कमी केलेले आहे, अशा मुलांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच रायडरसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही विमा उतरविला जावा. समान प्रोत्साहन भत्ता दिला जावा. तसेच, ऑर्डरचे दर वाढविण्यासह वेळेचे बंधन असू नये. नोटीस न देता कामावरून कमी करू नये.

मी सध्या बाणेर येथे राहत असून, बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी नसल्याने हे काम करावे लागत आहे. मला दिवसाला दोनशे रुपये पेट्रोल व शंभर रुपये इतर याप्रमाणे तीनशे रुपये खर्च येतो. तर, प्रत्येक ऑर्डरमागे तीस रुपये मिळतात. दिवसभरात पाचशे रुपयांपर्यंत रोजचे उत्पन्न मिळते. जवळची ऑर्डर असेल तरच हे काम परवडते; परंतु दर कमी केले जात असल्याने आमची अडचण होत आहे.
- तुषार नरवडे, डिलिव्हरी बॉय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com