झेडपी पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ

Pune ZP
Pune ZP

पुणे - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या नव्या निवडी पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय बुधवारी (ता. ११) राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यानुसार या निवडी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली आहे. या वृत्ताला ग्रामविकास विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे.

याबाबतचा तोंडी आदेश आज (ता. ११) सायंकाळी उशिरा फोनवरून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. याबाबतचा लेखी आदेश उद्या (गुरुवारी) काढण्यात येणार आहे. यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे याबाबत कालच (ता. १०) काढण्यात आलेल्या लेखी आदेशाला अवघ्या २४ तासांच्या आत स्थगिती देण्यात आली आहे. 

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अद्यापही राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आणि विस्तारही झालेला नाही. त्यातच येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत असल्याचे कारण देण्यात आले आहे. 

आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी या नव्या वर्षात म्हणजेच ४ जानेवारी २०२० ला घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नवे वर्ष, नवे अध्यक्ष, असे नवे सूत्रही जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या बाबतीत अस्तित्वात येणार आहे.

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतिपदासाठी उद्या सोडत
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यासाठी अखेर पुणे जिल्हा प्रशासनाला बुधवारी (ता. ११) मुहूर्त सापडला आहे. यानुसार ही सोडत येत्या शुक्रवारी (ता. १३ ) सकाळी अकराला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. 

राज्यातील अन्य सर्व जिल्ह्यांनी आपापल्या जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची आरक्षण सोडत याआधीच जाहीर केली आहे. याला केवळ पुणे जिल्हा अपवाद ठरला होता. नव्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडी अगदी तोंडावर येऊन ठेपल्या होत्या. तरीही जिल्हा प्रशासनाकडून या सोडतीची तारीख जाहीर केली जात नव्हती. त्यामुळे या सोडतीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु राज्याच्या ग्रामविकास खात्याने याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश मंगळवारी (काल) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार, जिल्हाधिकारी राम यांनी आज (ता. ११) या सोडतीची तारीख जाहीर केली आहे. 

दरम्यान, ही सोडत पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधील शरदचंद्र पवार सभागृहात काढण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती कायद्यातील तरतुदीनुसार निम्मी (५० टक्के) सभापतिपदे विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १३ पैकी सात पंचायत समित्यांचे सभापतिपद महिलांसाठी राखीव होणार आहेत.

या सोडतीसाठी विद्यमान सर्व सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com