
झेडपी, पंचायत समित्यांची येत्या २८ जुलैला आरक्षण सोडत
पुणे - राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या गटांची आणि २८४ पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत आता येत्या गुरुवारी (ता.२८ जुलै) काढण्यात येणार आहे. या सोडतीत पूर्वीप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचेही (ओबीसी) आरक्षण जाहीर केले जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम शुक्रवारी (ता.२२) जाहीर केला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार येत्या मंगळवारी (ता.२६ जुलै) या आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. सूचना प्रसिद्धीनंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत ही जिल्हास्तरावर तर, पंचायत समित्यांची आरक्षण सोडत ही त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी काढली जाणार आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार २८ जुलैला आरक्षण सोडत काढल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जुलैला नवीन आरक्षणाची प्रारूप अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार याआधी १३ जुलै रोजी ही आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. ही आरक्षण सोडत नागरिकांच्या मागास प्रवर्गांसाठीचे आरक्षणाशिवाय काढली जाणार होती. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयामुळे हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ऐनवेळी स्थगित करावा लागला होता. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने आता परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा हा सुधारित कार्यक्रम जाहीर केला असल्याचे शुक्रवारी (ता.२२) पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
झेडपीच्या ८२ जागांचे संभाव्य आरक्षण
- अनुसूचित जाती (एससी) प्रवर्ग --- ०८ (पैकी चार महिला)
- अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्ग --- ०६ (पैकी तीन महिला)
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) --- २२ (पैकी ११ महिला)
- खुल्या गटांसाठी --- ४६ ( पैकी २३ महिला)
- विविध प्रवर्गातील महिलांसाठी --- एकूण ४१
पुणे जिल्ह्यात ओबीसीसाठी २६.६ टक्के आरक्षण
राज्यातील ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पूर्वीप्रमाणे आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या जयंतकुमार बांठिया आयोगाने प्रत्येक जिल्ह्यातील ओबीसींच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाची टक्केवारी निश्चित केली आहे. यानुसार पुणे जिल्ह्याची ही टक्केवारी २६.६ टक्के इतकी आहे. नव्याने निश्चित करण्यात आलेली ही टक्केवारी २७ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे टक्केवारी कमी झाली असली तरी जिल्ह्यात ओबींसीना पूर्वीच्या टक्केवारी इतकेच आरक्षण मिळू शकणार आहे.
येत्या ५ आॅगस्टला नवे आरक्षण अंतिम होणार
येत्या २८ जुलैला आरक्षण जाहीर केल्यानंतर, या आरक्षणाची प्रारूप अधिसूचना येत्या २९ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २९ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत यावर हरकती व सूचना देता येणार आहेत. याबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी हे सुनावणी घेऊन निर्णय घेणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर येत्या ५ आॅगस्टला नवे आरक्षण अंतिम केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Web Title: Zp Panchayat Committees Will Leave Reservation On 28 July
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..