जिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा नाराजीचा सूर आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून चार विद्यार्थी जखमी झाले, यानंतर तरी शिक्षण विभागाला जाग येणार का, असा प्रश्‍न पालक, ग्रामस्थांना पडला आहे.

पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा नाराजीचा सूर आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून चार विद्यार्थी जखमी झाले, यानंतर तरी शिक्षण विभागाला जाग येणार का, असा प्रश्‍न पालक, ग्रामस्थांना पडला आहे.

भोर तालुक्यात नऊ शाळा भरतात सार्वजनिक जागेत
भोर -
 तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळांपैकी ९ शाळांच्या इमारती धोकादायक असल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. तालुक्‍याच्या भाटघर धरण खोरे, हिर्डोशी खोरे, वीसगाव खोरे या भागांतील अतिदुर्गम भागांबरोबर पुणे- सातारा महामार्गावरील शाळामधील इमारतींच्या खोल्यांचा समावेश आहे. 

कोळेवाडी-अंबाडे, कारी, कापूरव्होळ, माळेगाव, वर्वे ब्रु., कुसगाव, नाटंबी, माझेरी व तळे म्हसवली आदी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांची सोय शेजारच्या इमारतींमध्ये, सार्वजनिक जागेत किंवा मंदिरांमध्ये करण्यात आली आहे. अनेक प्रकारच्या गैरसोयी असूनही विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम शिक्षक करीत आहेत. या सर्व शाळा धोकादायक शाळांमध्ये कमीत कमी केवळ १६ वर्गखोल्यांची गरज असूनही त्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. 

या शाळांमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. चार वर्षांमध्ये तालुक्‍यातील केवळ १३ शाळांच्या वर्गखोल्यांसाठी मंजुरी मिळालेली आहे. तालुक्‍यातील शाळांमध्ये कमीत कमी १२५ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची मागणी आहे. याबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत. 

शिरूरमध्ये शाळांच्या पडव्या नादुरुस्त
टाकळी हाजी -
 जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. शिरूर तालुक्‍यात अनेक ठिकाणी वर्गखोल्यांच्या समोरील पडव्या धोकादायक झाल्याने मुलांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा नादुरुस्त व जुन्या झाल्याने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

चांडोह (ता. शिरूर) येथील काही वर्गखोल्या दुरुस्त केल्या असल्या तरी एक वर्गखोली नादुरुस्त आहे. तेथील पडवी विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. नादुरुस्त खोली व पडवीबाबत जिल्हा परिषदेला कळविण्यात न आल्याचे समजते. 

काही दिवसांपूर्वी मलठण येथे शाळेची भिंत कोसळली होती. ग्रामस्थांनी त्यानंतर चार वर्गखोल्या नव्याने बांधून घेतल्या. आमदाबाद येथील नऱ्हे वस्तीवरील शाळेचे पत्रे काही दिवसांपूर्वी उडून गेले होते. यामध्ये पडवीचेही नुकसान झाले होते. कवठे येमाई येथील जिल्हा परिषदेची शाळा धोकादायक झाल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत जुन्या खोल्या पाडून नव्याने खोल्या व पडवी बांधली. सविंदणे येथेही जुन्या खोल्यांच्या पडव्यांची दुरवस्था झाली आहे. पडवीत मुले खेळताना दिसतात. त्यामुळे मुलांना येथे अपघात होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या भागातील पडव्या पाडून टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  

अंथुर्ण्यात जीर्ण इमारतीमध्ये विद्यार्थी गिरवताहेत धडे  
वालचंदनगर -
 अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या जीर्ण इमारतीत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी धडे गिरवीत आहेत. 

जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक झाल्याने सन २००८ च्या सुमारास नवीन इमारत बांधण्यात आली. त्यात शाळेचे स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, गावातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाला वर्ग अपुरे पडत असल्याने इयत्ता सहावी, सातवी व आठवीचे सुमारे ५० विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून या इमारतीत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी बसत असलेल्या शेजारील वर्गावरील कौले पडली असून भिंत जीर्ण झाली आहे. मातोश्री अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब चवरे यांनी जिल्हा परिषदेला दुर्घटना घडल्यास संस्थेची जबाबदारी असल्याचे हमीपत्र लिहून दिले आहे. दरम्यान, ग्रामसभेत धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याचा ठराव केला आहे. 

दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला
या संदर्भात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेच्या सहापैकी तीन वर्गखोल्यांची दुरुस्ती केली आहे. उर्वरित तीन खोल्यांची स्वखर्चाने दुरुस्ती करून इमारत वापरण्याची परवानगी मागितली आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. 

कडूसमध्ये किचन शेडमध्ये वर्ग
कडूस -
 कडूस-क्रांतीनगर (ता. खेड) येथील पंचेचाळीस वर्षांपूर्वी बांधलेली जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली मोडकळीस आली आहे. धोकादायक इमारत कधीही कोसळण्याच्या भीतीने विद्यार्थी किचन शेडमध्ये बसून शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत.

कडूस-क्रांतीनगर येथे सुमारे १९७२च्या सुमारास शाळेसाठी एक कौलारू वर्ग खोली बांधण्यात आली होती. गेल्या पंचेचाळीस वर्षांत या वर्गखोलीची एकदाही दुरुस्ती करण्यात आली नाही. सिमेंट प्लॅस्टर विरहित वर्गखोलीच्या भिंतींना तडे गेले आहेत. कौले फुटली आहेत. कौलांखालच्या लाकडी पट्ट्या खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी पट्ट्या तुटल्या आहेत. लाकडी कैची, वासे सडले आहे. कैची वाकली आहे. छप्पर कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. फुटक्‍या कौलातून पावसाळ्यात शाळेत पाणी वाहत असते. खिडक्‍या तुटल्या आहेत. वर्गखोलीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. इमारत धोकादायक असल्याचे शिक्षकांनी प्रशासनाला कळविले आहे.

विद्यार्थ्यांची सोय किचन शेडमध्ये केली आहे. सध्या काही विद्यार्थी किचन शेडमध्ये बसून शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात बहुतांश आदिवासी विद्यार्थी आहेत. पंधरा वर्षांपूर्वी सरकारने या ठिकाणी आणखी एक वर्गखोली बांधून दिली. ती सुद्धा जीर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नवीन वर्गखोलीची सोय करावी, अशी मागणी आहे.

खळदला शाळा पाडण्याचा प्रस्ताव प्रलंबित
खळद -
 जिल्हा परिषदेच्या खळद (ता. पुरंदर) येथील शाळेची इमारत जुनी झाल्याने धोकादायक झाली आहे. ही इमारत पाडण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे तीन वर्षांपूर्वीच पाठवला आहे. मात्र, त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. 

धोकादायक इमारतीच्या बाजूलाच अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत आहे. शाळा नवीन इमारतीत भरते. जुनी इमारत वापरात नसली तरी तिच्या परिसरात ८२ मुलांचा दिवसभर वावर असतो. 

याबाबत माजी उपसरपंच सुरेश रासकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आम्ही ग्रामपंचायतीच्या बैठकीत जुनी इमारत पाडण्याचा ठराव केला होता. तो जिल्हा परिषदेकडे पाठवला होता. तसेच याबाबत जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहारही केला आहे. जुनी इमारत पाडण्यासाठी या आधीच्या मुख्याध्यापकांनी पत्रव्यवहार केला आहे. त्यावर कार्यवाही न झाल्याने तातडीने शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठवू, असे मुख्याध्यापक अलका रासकर यांनी सांगितले. 

पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण दीड हजार शाळा इमारतींची दुरुस्ती करण्याची गरज होती. सन २०१७- १८ मध्ये ३५२ शाळा इमारतींची, तर २०१८- १९ मध्ये ४०५ शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी एकूण २२ कोटी चार लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. अनेक शाळांची कामे अंतिम टप्प्यात आहेत, तर काही शाळा इमारतींची कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित इमारतींच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविलेले आहेत. तेथील शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.
- विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद

Web Title: ZP School Dangerous