जिल्हा परिषदेच्या शाळाही ‘लय भारी’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

शिक्षकांकडून सोशल मीडियावर जाहिरात; विद्यार्थी वाढविण्याचा प्रयत्न
खेड शिवापूर - आपल्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत, यासाठी गावोगावी सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये स्पर्धा रंगली आहे. त्यासाठी या शाळांनी गावोगावी फ्लेक्‍सबाजी सुरू केली आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळाही मागे नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांतील अनेक शिक्षक सोशल मीडियाच्या आधारे आपल्या शाळांची जाहिरात करून विद्यार्थीसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.

अलीकडील काही वर्षांत गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांची संख्या वाढल्याने सध्या या शाळांमध्येही विद्यार्थ्यांची चणचण आहे. त्यामुळेच आपापल्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. त्यासाठी प्रत्येक गावच्या रस्त्याला, चौका-चौकात इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळांचे प्रवेश सुरू असल्याचे लक्षवेधक फ्लेक्‍स लावण्यात आले आहेत. त्यावर आपल्या शाळेची विविध वैशिष्ट्ये मांडून या शाळा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.  

इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळाही मागे नाहीत. भले जिल्हा परिषदेच्या शाळांनी फ्लेक्‍सबाजी केली नाही; मात्र सोशल मीडियाचा वापर करून या शाळा विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. मराठी शाळांच्या अनेक शिक्षकांनी आपल्या शाळेच्या प्रवेशाचे विविध मेसेज बनवले असून, ते व्हॉट्‌सॲप आणि फेसबुक या सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यात मोफत प्रवेश, गणवेश, शालेय पोषण आहार, ई-लर्निंग शिक्षण व्यवस्था ही मराठी शाळेची वैशिष्ट्ये मांडली आहेत. तसेच केवळ जास्त फी, सूट-बूट आणि ने-आण करण्यास बस म्हणजे चांगले शिक्षण नाही, मराठी शाळांनी अनेक मोठे अधिकारी दिले असल्याचे सांगून जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश करण्याचे आवाहन या मेसेजमध्ये केले आहे. एकंदरीत सध्या सर्व शाळा आपली विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Web Title: zp school flex for admission