Decoding Kanyadan rituals in India
Decoding Kanyadan rituals in India

डिकोडिंग कन्यादान

भारतीय लग्नसंस्कृती म्हणजे चार ते पाच दिवसांचा खूप मोठा उत्सव असतो. सुंदर, आकर्षक नटलेली वधू आणि तितकाच मोहक असणारा वर, त्यातच भर म्हणजे वऱ्हाडी, ढोल-ताशे, संगीत, चालीरीती, निरनिराळ्या पदार्थांची मेजवानी... असा सर्व थाट आपल्या हिंदू लग्नपद्धतीमध्ये असतो. आपल्या अनेक चित्रपट-मालिकांमधून या लग्नाचे दर्शन होते, तेव्हा ते अनेकांना चांगलेच वाटतात. मात्र, आपण स्वतः या लग्नाचा भाग होतो, तेव्हा काही प्रथा, रुढी, परंपरा याबाबत शंका उपस्थित होत नाहीत का? हिंदू लग्नसंस्कृतीमध्ये कन्यादानाला महत्त्व आहे, असे सांगितले जाते. पण, आता आपण करतो, तेच हिंदू धर्म ग्रंथानुसार केले जाणारे कन्यादान आहे का? याचाच शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. 

मुलीला नेहमी आपल्या पुरुषी मानसिकतेखाली ठेवण्यासाठी नानाविध कारणांनी तिचा उदोउदो केला जातो; मग तो महिलादिन, लग्न असो किंवा अन्य कोणता समारंभ. एका घरात जन्म घेऊन दोन्ही घर उजळविण्याचे भाग्य मुलीला लाभते, असेही सांगितले जाते. मात्र, हा "भाग्य' शब्द लावून हा समाज आपल्या पुरुषी संस्कृतीला वरचढ ठरविण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा प्रश्न यावेळी नक्कीच मनात येतो. लग्नात पाळण्यात येणाऱ्या चालीरीतींचे प्रत्येकाने पालन करावे, असे आपला धर्मग्रंथ सांगत नाही. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या लग्नामध्ये काही रीतिरिवाज मान्य करण्यास नकार दिला होता. तिने तिच्या लग्नामध्ये एका महिला पुरोहिताची निवड केली होती आणि कन्यादानाला विरोध केला होता. याद्वारे तिने स्त्री-पुरुष समानतेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. अपेक्षेप्रमाणे तिच्यावर आपल्या समाजातून टीका देखील झाली. मात्र, तिच्या पावलावर पाऊल ठेवत कन्यादानाला विरोध करणाऱ्या आणखी मुली पुढे आल्या. माध्यमांनी त्यांना जगासमोर आणले. मात्र, प्रत्येकवेळीच आपला समाज इतका व्यक्त होतो का, असा प्रश्न यावेळी पडतो. 

आपल्या इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक महिला योद्धा, महिला नेत्या आणि कार्यकर्त्या होऊन गेल्यात. तरीही आज आपला समाज स्त्री समानतेसाठी झगडत आहे. मग ज्या पुरुषप्रधान संस्कृतीमधून स्त्रीद्वेष्ट्या समाजामधून हे सर्व घडतेय, त्यामागे नेमके काय कारण असेल? भारतीय लग्न संस्कृतीमधील विवादित प्रथा "कन्यादान' याचे मूळ शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही पुण्यातील जन प्रबोधिनीमधील डॉ. मनीषा शेट्टे यांच्याशी संवाद साधला. त्या गेल्या 13 वर्षांपासून पुरोहित असून पुरोहित बनू इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षित करतात. तसेच त्या संस्कृत भाषा, संस्कृती आणि संशोधन विभागाशी देखील जोडलेल्या आहेत. त्यांना आम्ही कन्यादानाबाबत विचारले असता, काळानुरूप कन्यादान ही धारणा कशी बदलत गेली, याबाबत त्यांनी सांगितले. 

डॉ. शेट्टे सांगतात, "आपल्या धर्मग्रंथानुसार कन्यादान हे सध्याच्या काळात सुरू असलेल्या परंपरेच्या अगदी विरोधी आहे. धर्मग्रंथानुसार कन्यादान ही अतिशय चांगली संकल्पना असून, त्यामध्ये वर हा सार्वजनिकरीत्या आपल्या वधूचा स्वीकार करतो आणि तिचा आदर करून तिला सर्वच बाबतीत समानतेची वागणूक देण्याचे वचन देतो. या परंपरेमध्ये समाजानुसार बदल होऊ शकतात. वैदिक काळामध्ये देखील स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार लग्न करणे किंवा एकटे राहण्याची त्यांना मुभा होती. मात्र, समाज बदलत गेला आणि महिलांच्या लग्न करण्याच्या स्वातंत्र्यामध्ये देखील बदल होत गेले. उच्च वर्ग, जात, समाज हे सर्व घटक उदयास आले आणि बालविवाहामध्ये वाढ झाली. त्यामुळे पालकांना मुलगी एक ओझे वाटू लागली. त्यामुळे कन्यादानाची चुकीची धारणा उदयास आली. याशिवाय वधूला गुप्त पद्धतीने दागदागिने, पैसे देण्याच्या पद्धतीला हुंड्याचे स्वरूप आले.' असे शेट्टे यांनी सांगितले. 

त्या पुढे सांगतात, "कन्यादान ही धारणा सर्वांनी स्वीकारली. यामध्ये वराने आपल्या मुलीचा आदर करावा, तिला आपले समजून प्रेम करावे आणि तिची काळजी घ्यावी, असे वचन वधुपिता वराकडून घेत असतात. आजही हीच परंपरा सुरू आहे.' 

आम्ही हिंदू धर्मातील काही चालीरीती म्हणजेच वराचे पाय धुणे, मंगळसूत्र किंवा बांगड्या घालणे या कितपत योग्य आहेत, असा प्रश्न त्यांना विचारला. स्त्री ही विवाहित असेल तर तिने दागिने घालावे, असे कुठल्याही वेदामध्ये लिहिलेले नाही. त्यावर त्या म्हणतात, ही प्रथा सध्याच्या काळात रूढ झाली आहे. त्या काळात वर आणि त्याचे कुटुंब हे दूरवरून वधूमंडपी पायी चालत यायचे. त्यामुळे त्यांना पाय धुण्यासाठी पाणी देणे गरजेचे होते. मात्र, आता वर हा कारने प्रवास करत वधूमंडपी पोहोचतो. त्यामुळे आता वराचे पाय धुण्याची काहीही गरज नसल्याचे शेट्टे म्हणाल्या. 

अलीकडच्या काळात या सर्व चालीरीती मोडून काढण्यासाठी महिला पुढाकार घेताना दिसत आहेत. ज्या काळात आपण प्रेमविवाहाच्या गोष्टी करतो, त्या काळात असल्या चालीरीती पाळण्याची मुळात गरजच काय? असा प्रश्न आपल्याला पडणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. 

...अन्‌ सुदैवाने कन्यादान टळले 

एका श्रेया नावाच्या मुलीचे डिसेंबरमध्ये लग्न झाले. तिला देखील तिच्या लग्नात कन्यादान करायचे नव्हते. तिच्या या निर्णयाला तिच्या सासरच्या मंडळींनी पाठिंबा दर्शविला. मात्र, आश्‍चर्यकारक बाब म्हणजे, तिच्या माहेरचे लोक कन्यादान करण्यावर ठाम होते. तिला कन्यादानासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तिच्या बहिणीच्या पतीने त्यांची समजूत घातली आणि सुदैवाने कन्यादान झाले नाही, असे श्रेया सांगते. 

बहिणीमुळे कन्यादानाबाबत डोक्‍यात प्रकाश पडला 

"माझ्या बहिणीने कन्यादानाला विरोध केला, त्यावेळी आम्ही या बाबीवर विचार करू लागलो. तोपर्यंत आमच्या डोक्‍यात कन्यादान ही चुकीची धारणा असल्याचे कधी आलेच नाही. मुलीला दान देण्याची काय गरज आहे? असा प्रश्न जेव्हा तिने माझ्या आईला विचारला, त्यावेळी आमच्या सर्वांच्या डोक्‍यात प्रकाश पडला. सर्वांना कन्यादान न करण्याच्या तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला, असे हर्ष वर्मा सांगतात. 

"कन्यादान म्हणजे मान-सन्मान'

रजत यांनी याला विरोध दर्शवत कन्यादान चांगले असल्याचे मत मांडले. ते म्हणतात, आम्ही लहानपणापासून एका विशिष्ट पद्धतीनेच झालेले लग्न पाहात आलो. कन्यादान हा एक मान-सन्मान समजला जातो. दुर्दैवाने अनेकांना तो मिळत नाही. त्यामुळे ही इच्छा मी माझ्या मुलीच्या लग्नात पूर्ण केल्याचे ते म्हणाले. 

"लोक पुत्रदानही करतात'

"काळानुसार परिस्थिती बदलत आहे. त्यामुळेच की काय महिला पुरोहितांमध्ये वाढ झाली आहे. तसेच स्त्रीद्वेष्ट्या समाजाचा विरोध करणाऱ्या लोकांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते. आम्ही एका लग्नामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी पुत्रदान करण्यात आले. म्हणजेच कन्यादानामध्ये जे वचन वर द्यायचा ते सर्व वचन वधूने दिले. या सर्व परंपरा मोडीत काढत नवीन काहीतरी स्वीकारताना पाहून आनंद वाटत होता,' असे डॉ. शेट्टे सांगतात. 

दुर्दैवाने ग्रामीण भागात नवीन बदल स्वीकारण्याची मानसिकता नाही. त्यासाठी शिक्षण गरजेचे आहे. त्यांना योग्य माहिती आणि शिक्षण मिळाल्यास ग्रामीण भागात देखील हे बदल नक्कीच घडून येतील. भारतात चालीरीती, परंपरा अनेक दिवसांपासून चालत आल्या आहेत. मात्र, त्यावर विश्वास ठेवायचा की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. मात्र, प्रत्येकाला याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. भारत एका वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि प्रगत राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे प्रत्येक छोटा प्रयत्न एक मोठा बदल नक्कीच घडवून आणू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com