story of masabumi hosona only japanese traveler on titanic ship
story of masabumi hosona only japanese traveler on titanic ship

'टायटॅनिक'मधून वाचलेल्या माणसाची उद्ध्वस्त कहाणी, वाचा सविस्तर

सन्मान, कर्तव्य आणि लज्जा ही तीन मुल्ये जपानच्या संस्कृतीमध्ये सामावलेली आहेत. समुराई संहितेचे उल्लंघन करणाऱ्यावर देशासोबत अप्रमाणिक वर्तवणूक केल्याचा ठपका ठेवला जातो. असचा ठपका एक जपानी नागरिक मसाबुमी होसोनो यांच्यावर ठेवण्यात आला. ते 10 एप्रिल 1912 ला रशियावरून आरएमएस टायटॅनिक या जहाजावरून द्वितीय श्रेणीतील प्रवासी म्हणून  लंडनमार्गे साऊथ्मॅटनला  जात होते. खोल समुद्रात त्या काळोख्या रात्री आपल्यासोबत काय घडेल? याची कल्पना कोणालाच नव्हती. त्या समुद्रालाही वाटले नसावे की याठिकाणी असं काही घडणार आहे. यामध्येच प्रवास करत असलेला जपानचा एकमेव प्रवासी होसोनोचे जीवन या जहाजामुळे पूर्णपणे बदलून जाईल, असा विचारही त्याने केला नव्हता. मात्र, झाले तसेच.  

'व्हाईट स्टार लाईन' या शिपिंग कंपनीचे हे सर्वात मोठे जहाज त्यावेळी प्रवाशांसाठी आकर्षण ठरले होते. त्यामुळे ही कंपनी प्रवाशांना सर्वात चांगल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करत होती. या सर्व सोयी-सुविधा आणि सर्वात मोठ्या जहाजावर प्रवास करण्याचा आनंद प्रवासाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक प्रवशांच्या चेहऱ्यावर दिसत होता. जहाजामध्ये सर्वीकडे आनंदीआनंद होता. 14 एप्रिल 1912 ला जे घडले, ते त्यांच्यासोबत घडेल, असा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. 

14 एप्रिलच्या मध्यरात्री मसाबुमी होसोनो यांना जहाजवरील एका कामगाराने उठवले. त्यावेळी हा प्रक्टीस अलार्म असावा, असे त्यांना वाटले. मात्र, ती एक चाचणी होती. कारण, हे जहाज उत्तर अटलांटीकमध्ये एका हिमनगाला धडकणार, असा संदेश पोहोचला होता. लाख प्रयत्नानंतर हे जहाज दुसऱ्या दिशेने वळविण्यात खलाशाला यश आले. मात्र, जहाजाचे एक टोक घासले गेले अन् जहाजामध्ये पाणी भरू लागले. आणि इथूनच सुरू झाला समुद्रातील थरार. टायटॅनिकचे तळमजले हळूहळू पाण्यानं भरत होते तसतसा जहाजावर गोंधळ, भीती आणि आक्रोश वाढत होता. ती वेळ होती रात्री 11 वाजून 40 मिनिटे. त्यामुळे सर्वत्र अंधार होता. त्यामध्येही होसोनो हे वरच्या श्रेणीकडे जायला निघाले. मात्र, जहाजावरील एका कर्मचाऱ्याने त्यांना  वाईट वागणूक देत तिसऱ्या श्रेणीतील प्रवाशांमध्ये ढकलले. त्यानंतर पहिल्या श्रेणीतील सर्व प्रवाशांनी जीवरक्षा बोट भरण्यात आली. केवळ त्याच्या नशीबाने तो वरच्या श्रेणीत पोहोचला तर खरा; मात्र, त्याठिकाणी पोहोचल्यावर उपलब्ध असलेल्या जीवरक्षा बोट या सर्व प्रवाशांसाठी पुरेशा नाही हे त्यांना कळून चुकले होते. त्यांनी दहाव्या क्रमांकाच्या जीवरक्षा बोटकडे बघितले तेव्हा जहाजामध्ये दोन जागा शिल्लक असल्याचा एका अधिकाऱ्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. तेव्हा त्यांनी संधी साधून त्यात उडी घेतली. त्यावेळी होसोनो यांनी उडी घेतल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. मात्र, अंधार असल्यामुळे त्यांना कदाचित होसोनो दिसले नसावे म्हणून त्यावेळी ते सुरक्षित राहिले. जवळपास आठ तासांत जीवरक्षा बोटमधील प्रवाशांना वाचविण्यात यश आले. सुमारे टायटॅनिकवरील 2200 प्रवाशांपैकी 1514 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मात्र, नशिबाने होसोनो त्यातून बचावला होता. जीव तर वाचला मात्र त्याचा प्रवास तिथेच थांबला नव्हता.

होसोनो जपानला गेला तेव्हा

इतक्या मोठ्या दुर्घटनेमधून वाचल्यानंतर होसोनो जपानमध्ये पोहोचला. उर्वरीत जीवन आपल्या कुटुंबीयांसोबत सुखाने आणि आनंदाने घालविण्याची संधी त्याच्याकडे होती. मात्र, जहाजावर एकच जपानचा प्रवासी होता आणि त्याने फक्त स्वतःलाच कसे वाचविले, याबाबतच्या अनेक बातम्या वेगाने प्रसारीत झाल्या. त्यावेळी अनेक पुढाऱ्यांनी देखील होसोनोवर टीका केली होती. महिला आणि मुलींना वाचविण्यात प्राधान्य न देता होसोनोने स्वतःचे प्राण वाचविले, अशा बातम्या माध्यमात झळकल्या. होसोनो याने जपानची प्रतिष्ठा धुळीस मिळविल्याची टीकाही त्याच्यावर झाली. परिणामी, त्याला त्याची नोकरी गमवावी लागली. असा अप्रामाणिक कर्मचारी नको, म्हणून कंपनीने त्यांना काढून टाकले होते. जपानच्या पुस्तकामध्ये होसोनोवर लिहिण्यात आले. त्यात तो देशाशी कसा अप्रामाणिकपणे वागला, याचे दाखले देण्यात आले. त्याची वागणूक कशी असभ्य होती हे देखील एका प्राध्यापकाने पुस्तकात नमूद केले होते. होसोनो याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी समुराई संहितेचे उल्लंघन करून देशाची इज्जत घालविली असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. 

कोण आहे मसाबुमी होसोनो? 

मसाबुमी होसोनेचे जीवन अगदी साधे होते. त्यांचा जन्म 1870 मध्ये जापान येथे झाला. तसेच 1896 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करून ते एका स्टॉक एक्सचेंज कंपनीमध्ये रुजू झाले. 1897 मध्ये कंपनी सोडून जपानच्या ट्रान्सपोर्ट मंत्रालयात रुजू झाले.  त्यांनी शिक्षणाबरोबरच रशियन भाषेचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांना नोकरीसाठी रशियाला देखील जाता आले असते. होसोनो टायटॅनिक जहाजामध्ये असलेला जपानचा एकमेव प्रवासी होता. जहाज दुर्घटनेमधून तो सुदैवाने बचावला होता. मात्र, घरी पोहोचताच माध्यम आणि काही सार्वजनिक संस्थांनी त्याच्यावर टीका-टीपण्णी करून अनेक आरोप लावले होते. होसोनोमुळे देशाला अपमानित व्हावे लागले असाही आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. 

होसोनोने काय लिहिले होते पत्रात?

होसोनोचा 14 मार्च 1939 ला मृत्यू झाला. होसोनाचा मृत्यू होईपर्यंत त्याने देशाशी गद्दारी केल्याचे त्याचे कुटुंबीय मानत होते. मात्र, होसोनो हा शेवटच्या श्वासापर्यंत घडलेल्या घटनेबद्दल कोणासोबतच बोलला नाही. त्याने आपल्या पत्नीला काही पत्र लिहिली होती. ती डायरी अस्तित्वात असल्याचे त्याच्या कुटुंबीयांना माहिती होते. मात्र, कुटुंबायांनी कधी ते बाहेर काढले नाही. त्यानंतर त्याची नात युरीको हीने ते पत्र बाहेर काढून माध्यमांसमोर मांडले.  त्यामध्ये टायटॅनिकच्या बुडालेल्या जहाजाबद्दल वर्णन केले होते. 

'मी द्वितीय श्रेणीमध्ये बसलो होतो. त्यावेळी कोणीतरी दरवाजा ठोठावला. त्यावेळी बाहेरचे दृश्य बघताच मी पळत सुटलो. मात्र, एक विदेशी म्हणून त्याला खालच्या डेकला जाण्यास सांगण्यात आले. आणीबाणीचा इशारा देणारे आगीचे गोळे हवेत झाडले जात होते. त्यावेळी अगदी भायनक आवाज आणि सर्वत्र निळे-निळे दृश्य दिसत होते. त्यावेळी भीती कशी दूर करावी, हे कळत नव्हते. कुठलेही असभ्य वर्तन न करता मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. एक जपानी नागरिक म्हणून माझ्या हातून देशाचा अपमान होऊ नये, असे कुठलेही कृत्य घडू नये यासाठी मी प्रयत्न करत होतो. तरीही मी मला वाचविण्यासाठी कोणी येईल का? याची संधी शोधत होतो. एका बोटीवर दोन जागा शिल्लक असल्याचा आवाज आला आणि हीच जीव वाचविण्याची संधी होती. त्यावेळी माझी प्रिय पत्नी आणि मुलांचा चेहरा मला पाहायला मिळणार नाही, याची पूर्णपणे जाणीव झाली होती. टायटॅनिक बुडत होते त्याप्रमाणेच बुडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नव्हता. मात्र, पहिल्यांदा उडी मारल्यामुळे मला माझा जीव वाचविता आला. उडी मारल्यानंतर काही क्षणातच जहाज बुडाले आणि शेकडो लोकांचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज कानी पडला. आमच्या जीवरक्षा बोटमध्ये अनेक आपले कुटुंबीय सुरक्षित असावे यासाठी प्राथर्ना करत होते. कोणी रडत होते. मी देखील त्यांच्यासारखाच निराश होते. कारण पुढील काळात माझ्यासोबत काय होणार आहे? हे मला माहिती नव्हते, असे वर्णन त्याने पत्रामध्ये केले आहे.  त्यावरच टायटॅनिक हा चित्रपट तयार झाला. या पत्रामुळे होसोनोला जपानमध्ये परत मान-सन्मान मिळाला. 

कसा घडला टायटॅनिकचा थरार

1912 मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक (इंग्लिश: RMS Titanic) हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते.10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले. चार दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते. त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टिमरने टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवार 14 एप्रिल दुपारी 13.45 ला पाठवला. यावेळी बिनतारी संदेश सांभाळण्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहणाची प्रमुख कामगिरी असल्याने यासंदेशाला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमनग असल्याचा संदेश असाच वाया गेला. त्याच रात्री 11:40 वाजता टायटॅनिक किनारयापासुन 400 मैलांवर होते आणि टायटॅनिक वरील टेहाळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच हिमनग आढळला. तो संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले. बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशा बदलण्यात आली. तरी टायटॅनिक ची सरळ धडक टाळण्यात जरी यश आले असले तरी जहाज पूर्णपणे बचावले नाही. 

...अन् सुरू झाला टायटॅनिकचा थरार -

टायटॅनिक च्या उजव्या बाजुचा पाण्याखाली 20 फुट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेला, व या भागात झालेल्या भेगांतुन पाणी वेगाने आत घुसले. तळाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिक चा मागील पाण्याखाली गेला ज्यामुळे पाणी आणखी वेगाने आत शिरु लागले. त्यामध्ये एकूण 2227 प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी 1517 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे 2 प्रमुख कारण होते. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील ( 1178 ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब , टायटॅनिक वरील बऱ्याच जणांना घटनेचे गांभीर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम, अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ 706 जणच आपले प्राण वाचवू शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला 15 मिनिटात मृत्यू येतो.

टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती. तसेच या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com