या वर्षात सोने सत्तर हजार शक्य; सौरभ गाडगीळ यांचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold

जागतिक अस्थिरतेचे वातावरण पाहता सोन्याचे भाव लवकरच साठ हजारांच्या घरात जातील अशी प्रतिक्रिया अनेक जाणकारांनी दिवाळीच्या सुमारासच व्यक्त केली होती.

Gold Rate : या वर्षात सोने सत्तर हजार शक्य; सौरभ गाडगीळ यांचा अंदाज

मुंबई - सोन्याचा भाव सध्या दहा ग्रॅमला साठ हजार रुपयांच्या आसपास असला तरीही सध्याची परिस्थिती पाहता पुढील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी लोक सुरक्षित साधन म्हणून सोन्यात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे या वर्षभरात सोन्याचा भाव सत्तर हजारांच्या जवळ गेला तरी आश्चर्य वाटणार नाही, असा अंदाज पीएनजी ज्वेलर्स चे सीएमडी सौरभ गाडगीळ यांनी सकाळ कडे व्यक्त केला.

जागतिक अस्थिरतेचे वातावरण पाहता सोन्याचे भाव लवकरच साठ हजारांच्या घरात जातील अशी प्रतिक्रिया अनेक जाणकारांनी दिवाळीच्या सुमारासच व्यक्त केली होती. त्यानुसार आता सोन्याचे भाव त्या पातळीवर आले आहेत. मात्र अजूनही सोन्याच्या भावाची घोडदौड अशीच सुरू राहील असेही या क्षेत्रातील व्यावसायिक दाखवून देत आहेत.

जागतिक आर्थिक बाजारांमधील सध्याची अस्थिरता, अमेरिका व युरोपमध्ये उघड होणारे बँकांचे घोटाळे तसेच पुढे काय होईल याबद्दलची भीती आणि मंदीसदृश्य वातावरण यामुळे लोकांचा कल सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे आहे. अशा परिस्थितीत मोठ्या वित्तसंस्था, मध्यवर्ती बँका, बडे गुंतवणूकदार हे देखील इतर गुंतवणुकांमधील धोका कमी करण्यासाठी संतुलित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत. त्यामुळे साठ हजार रुपयांच्या भावातही सोन्याला अजून मागणी आहे आणि या वर्षभरात सोन्याचा भाव सत्तर हजारांच्या जवळपासही जाऊ शकेल असे जाणकार दाखवून देत असल्याचेही गाडगीळ म्हणाले.

या वर्षात सध्याच्या साठ हजारांच्या भावापेक्षाही दहा ते बारा टक्के भाव वाढले तरी ६६ हजारांचा भाव कुठेच गेला नाही. गुंतवणुकीपेक्षाही सुरक्षितेसाठी म्हणून लोक सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी देखील खूपच वाढली असून आज या भावाला देखील सोने घेतले तरी पुढे भाव वरच जाईल, तो साठ हजारांच्या खाली जाणार नाही व आपले नुकसान होणार नाही याची गुंतवणूकदारांना खात्री आहे. त्यामुळे गुंतवणुकीला हीच वेळ योग्य वाटल्याने खरेदी सुरू आहे. या वर्षभरात सोने १० ग्रॅमला ५८ हजार ते सत्तर हजार रुपयांच्या भावपातळीत राहील, असा आपला अंदाज असल्याचेही गाडगीळ म्हणाले.

उद्याचा पाडवाही सोने व्यावसायिकांसाठी चांगलाच जाईल. एरवीही पाडव्याला सोन्याची खरेदी होतेच, त्यातही मार्चएंडच्या आधी खरेदी करण्याकडे लोकांचा कलही असतो. तसेच आगामी लग्नसराईसाठी देखील लोक खरेदी करत आहेतच. त्यामुळे मागील वर्षी पाडव्याला जेवढ्या रकमेची सोने खरेदी झाली त्यापेक्षा निदान चाळीस टक्के जास्त खरेदी यावर्षी होईल. कारण यावर्षी भावही वाढले आहेत, मात्र वजनाच्या हिशोबात देखील दहा ते पंधरा टक्के जास्त सोने खरेदी होईल. उद्याही वळे, नाणी आणि बिस्किटे असे चोख सोने ३५ टक्के लोक खरेदी करतील व उरलेले लोक दागिने खरेदी करतील असा अंदाज असल्याचेही गाडगीळ म्हणाले.