Adani Group: अदानी समूहाचा मोठा निर्णय! मुंबईतील रिअल इस्टेट मालमत्ता विकणार? कारण...|Adani Group may sell non-core real estate assets to fund new projects report | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Group

Adani Group: अदानी समूहाचा मोठा निर्णय! मुंबईतील रिअल इस्टेट मालमत्ता विकणार? कारण...

Adani Group: अदानी समूह महत्त्वाच्या नसलेल्या रिअल इस्टेट मालमत्ता विकण्याचा विचार करत आहे. या मालमत्ता विक्रीतून येणारा पैसा समूह त्याच्या नवीन रिअल इस्टेट उपक्रमांसाठी वापरणार आहे, असा अहवाल इकॉनॉमिक टाइम्सने दिला आहे.

विक्रीसाठी असलेल्या मालमत्तांपैकी एक म्हणजे Inspire BKC, मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेला हा एक व्यावसायिक रिअल इस्टेट प्रकल्प आहे.

तसेच यामध्ये मुंबईजवळील ठाण्यातील एसीसीच्या मालकीच्या सुमारे 16 एकर जमिनीचा देखील समावेश आहे. अदानी समूहाने संभाव्य खरेदीदारांशी चर्चा सुरू केली आहे. या मालमत्तांची अंदाजे किंमत 650 कोटी रुपये आहे.

अदानी समूहाने भारतातील अत्यंत मागणी असलेल्या बाजारपेठांमध्ये व्यावसायिक आणि रिअल इस्टेट प्रकल्प विकसित करण्यासाठी झपाट्याने पाऊले उचलली आहेत. समूहाने अंदाजे 5,069 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प देखील हाती घेतला आहे.

काल गौतम अदानी समूहाचे दोन शेअर्स नुकतेच एमएससीआय ग्लोबल इंडेक्समधून बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्यांचे बाजार मूल्य 10 अब्ज डॉलरनी घसरले.

एमएससीआय इंकने अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला निर्देशांकातून बाहेर काढले होते. त्याचा परिणाम अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सवर दिसून आला आहे.

शुक्रवार, 19 मे रोजी गौतम अदानी समूहाच्या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

एमएससीआय इंडिया स्टँडर्ड इंडेक्समधून बाहेर पडल्यानंतर दोन्ही कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. अदानी समूहाच्या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये यंदाच्या फेब्रुवारीनंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये, अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर, अदानी समूहाच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली.

एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हा अहवाल समोर आल्यानंतर 37व्या क्रमांकावर पोहोचले होते.

मात्र, काही दिवसा नंतर ते 23व्या स्थानावर आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती 53.9 अब्ज डॉलर आहे.