
Anand Mahindra: बिल गेट्सचे वर्गमित्र असलेल्या आनंद महिंद्रांचे असे बदलले नशीब, आज आहेत कोट्यवधींचे मालक
Anand Mahindra Net Worth: आज महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी महिंद्रा ग्रुपला यशाच्या शिखरावर नेले आहे. 1 मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो आणि आनंद महिंद्रा यांचा जन्म याच दिवशी झाला हा देखील योगायोग म्हणावा लागेल.
आज ऑटो क्षेत्रापासून ते आयटी आणि एरोस्पेसपर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कंपनीने आतापर्यंत लाखो मजुरांना आधार दिला आहे.
आनंद महिंद्रा हे एकेकाळी अब्जाधीश आणि मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांचे वर्गमित्र होते. आज आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी करोडोंची संपत्ती कमावली आहे. आनंद महिंद्रा ही महिंद्रा कुटुंबाची तिसरी पिढी आहे.
आनंद महिंद्रा हे सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते वेळोवेळी ट्विट करून आपले मत लोकांपर्यंत पोहोचवत असतात.
आज त्यांचा वाढदिवसही त्यांनी मुलांमध्ये जाऊन साजरा केला. ज्याचा फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांना फोटोग्राफीचीही खूप आवड आहे.
आनंद महिंद्रा हे कोट्यवधी संपत्तीचे मालक:
फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, आनंद महिंद्रा यांची रिअलटाइम संपत्ती 2.1 अब्ज डॉलर म्हणजे 17,000 कोटी रुपये आहे. त्यांच्या महिंद्रा अँड महिंद्राचा एकूण महसूल सुमारे 19 अब्ज डॉलर आहे.
हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी महिंद्रा स्टीलमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश केला. आनंद महिंद्रांना कलेची आवड आहे आणि त्यांच्याकडे अनेक मौल्यवान चित्रे आणि शिल्पे आहेत.
देशातील उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अनेकांचे नशीब बदलले, पण आनंद महिंद्राचे नशीब बदलण्याचे श्रेय एसयूव्ही स्कॉर्पिओला जाते. महिंद्राने 2002 मध्ये आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली स्कॉर्पिओ ही पहिली SUV भारतीय बाजारपेठेत सादर केली.
स्कॉर्पिओचे यश पाहून हॉवर्ड विद्यापीठाने केस स्टडी म्हणून त्याचा समावेश केला. स्कॉर्पिओप्रमाणेच बोलेरोलाही प्रचंड यश मिळाले आहे.