RBI Report : फसवणूक वाढली, पण रक्कम घटली; रिझर्व्ह बँकेचा अहवाल : कठोर उपाययोजनेची पावले टाकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

banking Fraud increased amount decreased RBI Report Strict remedial steps to taken cyber crime police

RBI Report : फसवणूक वाढली, पण रक्कम घटली; रिझर्व्ह बँकेचा अहवाल : कठोर उपाययोजनेची पावले टाकणार

नवी दिल्ली : देशातील बँकिंग क्षेत्रातील फसवणुकीच्या प्रकरणांचा आकडा २०२२-२३ या वर्षात वाढला असला, तरी यातील रकमेचे प्रमाण मात्र निम्म्याने घटले आहे, असे रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

आरबीआयच्या अहवालानुसार, वर्ष २०२२-२३ या वर्षात बँकिंग क्षेत्रातील फसवणुकीच्या प्रकरणांची आकडेवारी १३,५३० वर गेली होती, परंतु त्यात गुंतलेली रक्कम ३०,२५२ कोटी रुपये आहे.

ही रक्कम २०२१-२२ या वर्षातील अशा फसवणूक प्रकरणातील एकूण रकमेच्या निम्मी आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. फसवणुकीच्या घटना प्रामुख्याने डिजिटल पेमेंट्स प्रकारात झाल्या आहेत,असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बँकिंग क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलणार असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

मूल्याच्या बाबतीत फसवणुकीची प्रकरणे प्रामुख्याने कर्ज विभागामध्ये नोंदवली गेली आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण ९,०९७ फसवणूक झाली होती. ज्यात ५९,८१९ कोटी रुपयांचा समावेश होता, तर २०२०-२१ मध्ये, प्रकरणांची संख्या ७,३३८ होती आणि त्यात १,३२,३८९ कोटी रुपये गुंतले होते.

वर्ष २०२२-२३ दरम्यान फसवणुकीत गुंतलेल्या एकूण रकमेत २०२१-२२ च्या तुलनेत ४९ टक्क्यांनी घट झाली, तर २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये नोंदवलेल्या एकूण फसवणुकीच्या रकमेत ५५ टक्के घट झाली आहे.

खासगी क्षेत्रातील बँकांनी नोंदवलेल्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये लहान मूल्याचे कार्ड, इंटरनेटद्वारे झालेल्या फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणूक मुख्यत्वे कर्ज प्रकारांमध्ये होते, असेही या अहवालात म्हटले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०२२-२३ दरम्यान २१,१२५ कोटी रुपयांच्या ३,४०५ फसवणूक प्रकरणांची नोंद केली, तर खासगी बँकांनी ८,९३२ प्रकरणे नोंदवली ज्यात ८,७२७ कोटी रुपयांचा समावेश आहे. उर्वरित प्रकरणे विदेशी बँका, वित्तीय संस्था, लघु वित्त बँका आणि पेमेंट बँकांची आहेत. आकडेवारीनुसार, एकूण ३०,२५२ कोटी रुपयांपैकी ९५ टक्के किंवा २८,७९२ कोटी रुपये कर्ज प्रकरणांमध्ये नोंदवले गेले.

ठळक मुद्दे

  • वर्ष २०२२-२३ मध्ये फसवणुकीची प्रकरणे १३,५३०

  • गुंतलेली रक्कम ३०,२५२ कोटी रुपये

  • सार्वजनिक बँकामधील ३,४०५ प्रकरणे, रक्कम २१,१२५ कोटी रुपये

  • खासगी बँकामधील ८,९३२ प्रकरणे, रक्कम ८,७२७ कोटी रुपये

  • वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण ९,०९७ प्रकरणे

  • गुंतलेली रक्कम ५९,८१९ कोटी रुपये

  • रकमेत २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये ४९ टक्के घट

  • खासगी बँकांकडील प्रकरणांमध्ये कार्ड, इंटरनेटद्वारे अधिक फसवणूक

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणूक कर्ज प्रकारामध्ये

टॅग्स :BankrbiFraud case news