Amul Vs Nandini: अमूल-नंदिनी वादावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या, कर्नाटक जनते...|Buying Amul not against Karnataka says Nirmala Sitharaman on Amul-Nandini controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala Sitharaman

Amul Vs Nandini: अमूल-नंदिनी वादावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या, कर्नाटक जनते...

Amul Vs Nandini: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्नाटकातील अमूलच्या प्रवेशाबाबत नुकत्याच झालेल्या वादावर प्रथमच विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, अमूल दूध खरेदी करणे हे कर्नाटक किंवा कर्नाटकच्या जनतेच्या विरोधात नाही.

या प्रकरणाला जाणीवपूर्वक राजकीय मुद्दा बनवण्यात आला आहे. नंदिनी मिल्क ब्रँड संपवण्यासाठी अमूलचे दूध कर्नाटकात आणले जात आहे, असे बोलणे लज्जास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशात प्रत्येक राज्याची स्वतःची दूध सहकारी संस्था आहे आणि कर्नाटकचा नंदिनी हा प्रसिद्ध ब्रँड आहे. त्या म्हणाल्या की, मी जेव्हा-जेव्हा कर्नाटकात जाते तेव्हा नंदिनी दूध, दही, पेडा खाते.

दुसरीकडे मी दिल्लीत राहते तेव्हा तिथे अमूलचे दूध घेते, याचा अर्थ ते कर्नाटकच्या विरोधात आहे असे नाही.

अमूल-नंदिनी मुद्द्यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्नाटकातील थिंकर्स फोरममध्ये बोलताना, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी हा मुद्दा उचलला जात असल्याचा आरोप केला आहे, असे बिझनेस टुडेने वृत्त दिले आहे.

सीतारामन यांनी असा युक्तिवाद केला की डेअरी उद्योगाभोवती राजकीय समस्या निर्माण करण्याऐवजी भारताला सर्व बाजूंनी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा:

निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गुजराती दूध ब्रँड अमूल कर्नाटकात आला तेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते. निवडणुका जवळ आल्याने जाणीवपूर्वक हा भावनिक मुद्दा बनवण्यात आला आहे असे त्या म्हणाल्या.

अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, मी त्यावेळच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव येथे घेतले पाहिजे, कारण तेच माजी मुख्यमंत्री आता कर्नाटकातील अमूलच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यांच्याच काळात अमूलने उत्तर कर्नाटकात मार्केटिंगमध्ये प्रवेश केला आणि आज तेच विरोध करत आहेत.

शेतकऱ्यांचा पाठिंबा कायम राहील:

सीतारामन यांनी दावा केला की बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पहिल्यांदाच दुधाच्या खरेदी दरात वाढ केली होती. त्या म्हणाल्या की, आताच्या भाजप सरकारने पुन्हा 5 रुपयांची दरवाढ केली आहे, त्यामुळे दूध उत्पादकांना पाठिंबा मिळाला आहे.