क्रेडिट कार्डावरून फसवणूक Credit card fraud woman entrepreneur blocked the credit card and complained cyber cell moved quickly | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सायबर सेल

क्रेडिट कार्डावरून फसवणूक

शिरीष देशपांडे

पुण्यातील एका महिला उद्योजिकेचे क्रेडिट कार्ड वापरून चोरट्यांनी एक लाख ४० हजार रुपये चोरल्याची बातमी अलीकडेच ऐकिवात आली. या महिला उद्योजिकेला एक दिवस अचानक डायरेक्ट क्रेडिट कार्ड वापरून एक लाख ४० हजार रुपये एका मर्चंट अकाउंटला हस्तांतरीत झाल्याचे संदेश मिळाले. ५० हजार, ५० हजार आणि ४० हजार असे तीनवेळा हे व्यवहार झाले आणि तसे तीन संदेश प्राप्त झाले.

चोरट्यांनी एकूण १ लाख ४० हजार रुपये एका मर्चंट अकाउंटला हस्तांतरीत करून घेतले आणि त्या खात्यातून झारखंड राज्यात वेगवेगळ्या ‘एटीएम’मधून एक लाख ३९ हजार त्वरित काढूनही घेतले. हे व्यवहार होताना महिला उद्योजिकेला ‘ओटीपी’ विचारला गेला नव्हता. मात्र, रक्कम खात्यात पाठवले गेल्यावर लगेच क्रेडिट कार्डचा वापर झाल्याचे संदेश आले होते.

हे कसे घडले ?

या महिला उद्योजिकेने एका बँकेचे फक्त क्रेडिट कार्ड घेतलेले होते. ते कार्ड आणि क्रेड (सीआरईडी) ॲप वापरून त्याद्वारे त्या पेमेंट करत असत. एक दिवस त्या ॲपद्वारे एक व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही आणि ‘अंडर प्रोसेस’ असा संदेश (एसएमएस) आला होता. म्हणून त्यांनी ‘क्रेड’ ॲपच्या कस्टमर केअरकडे तक्रार केली.

तिथल्या अधिकाऱ्याने तुमच्या तक्रारीची दखल घेतली असून, लवकरच परत संपर्क साधतो, असे सांगितले आणि अर्ध्या तासात ७३२१****** या नंबरवरून फोन आला.पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने कस्टमर केअर अधिकारी बोलतोय, असे सांगितले आणि काय झाले त्याची सविस्तर माहिती विचारली. अर्धवट झालेल्या व्यवहारासह इतर माहितीही त्याने विचारली आणि फोन बंद केला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने लागोपाठ ५० हजार , ५० हजार आणि ४० हजार रुपयांचे व्यवहार कार्डवरून झाल्याचे म्हणजे एका मर्चंट खात्यावर पैसे हस्तांतरीत झाल्याचे आणि खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे संदेश आले.

ते बघताच, या महिला उद्योजिकेने क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आणि सायबर सेल व बँकेत तक्रार केली. सायबर सेलने तातडीने हालचाल केली, मात्र चोरटयांनी बहुतांश रक्कम काढून घेतली होती आणि फक्त ९५० रुपये त्या बोगस खात्यात शिल्लक होते, ते परत मिळाले. यामध्ये कस्टमर केअर म्हणून जो नंबर वापरला गेला तो चोरट्यांचा असावा आणि चोरट्यांनी मिळालेल्या माहितीचा वापर करून हा गुन्हा केल्याचे दिसून येते.

काय काळजी घ्यावी?

कस्टमर केअर नंबर शोधताना त्या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरूनच घ्यावा. गुगलवर शोधल्यास बोगस कस्टमर केअर नंबर मिळण्याची शक्यता आहे आणि भांबावलेल्या स्थितीत आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आहे.

कस्टमर केअर नंबर साधारणतः १८०० ने सुरू होतो. हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

आपली कार्डसंबंधी गोपनीय माहिती उदा, कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर, अकाउंट नंबर, आयडी, पासवर्ड, पत्ता, पॅन कार्ड, आधारकार्ड सुरक्षित राहील याची काळजी घेणे.

आपल्या क्रेडिट कार्ड व्यवहाराची मर्यादा अगदी मर्यादित ठेवावी. उदा, फक्त पाच हजार रुपये

मोठे व्यवहार शक्यतो ‘एनईएफटी’(NEFT) सारख्या माध्यमातून करावे.

बँकेचा किंवा इन्शुरन्स कंपनीचा क्रेडिट कार्ड वापराचा विमा घ्यावा.

हल्ली सर्व बँकांनी क्रेडिट किंवा डेबिट कार्डची मर्यादा कमी करणे वा वाढवणे हे नेट बँकिंग साईटवर सुलभ केले आहे.

आपल्या सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्डची मागून पुढून एक झेरॉक्स काढून ठेवावी, अडचणीच्या वेळेस मोठे नंबर आणि त्या मागे असलेले कस्टमर केअर नंबर उपयोगी पडतील.

आपल्या क्रेडिट कार्डवरील प्रत्येक व्यवहार तपासावा.

कार्ड वापरताना भरमसाट पॉईंट्ससाठी कोणत्याही ॲपच्या मोहात पडू नये, ते धोकादायक ठरू शकते.

कार्डचा पासवर्ड वारंवार बदलावा.

फसवले गेल्यास काय करावे?

ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

बँकेत समक्ष जाऊन तक्रार नोंदवा, नुसती तक्रार नोंदवून थांबू नका, तर सतत पाठपुरावा करा.

आपल्या फोनवर किंवा संगणकावर या संदर्भातील काही पुरावे, संदर्भ असतील, तर जपून ठेवा. त्यासाठी संगणक सल्लागाराची मदत घ्या. हे पुरावे कोर्टात जरूर पडल्यास देता येतील.

१९३० अथवा १५५२६० (महाराष्ट्रासाठी) या नंबरवर संपर्क साधा.

शक्य असेल आणि आवश्यक असेल, तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.

(लेखक सीए आणि संगणक कंट्रोल,सायबर गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)