३१ मार्चपूर्वी करा ही आर्थिक कामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Do these financial work before March 31 mutual fund investment pan adhar card

३१ मार्चपूर्वी करा ही आर्थिक कामे

- अनिरुद्ध राठी

आर्थिक वर्ष २०२२-२३ येत्या ३१ मार्च २०२३ रोजी संपत आहे. त्यासाठी आता अवघे अकरा दिवस आपल्या हातात आहेत. या ३१ मार्चपूर्वी प्राप्तिकर आणि आर्थिक विषयक काही महत्त्वाची कामे आवर्जून पूर्ण करणे अत्यावश्‍यक आहेत. काय आहेत ही कामे ते जाणून घेऊया.

करबचत गुंतवणूक

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी करबचतीसाठी आवश्‍यक गुंतवणूक अजूनही केली नसल्यास ३१ मार्च २०२३ पर्यंत वेळ आहे. जुन्या करप्रणालीअंतर्गत करदात्यांना प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८०सी’ अंतर्गत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी),

म्युच्युअल फंडाची इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस), आयुर्विमा, सुकन्या समृद्धी योजना, पाच वर्षांची मुदत ठेव आदींमध्ये गुंतवणूक करून रु. दीड लाखांपर्यंतची सवलत मिळविण्यासाठी ही गुंतवणूक ३१ मार्चपूर्वी करणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये (एनपीएस) ‘कलम ८० सीसीडी(१ बी)’ अंतर्गत गुंतवणूक करून, ‘कलम ८० सी’ मधील दीड लाखांव्यतिरिक्त ५० हजार रुपयांच्या अतिरिक्त सवलतीचा लाभ घेता येऊ शकतो.

आगाऊ प्राप्तिकर (ॲडव्हान्स टॅक्स) करदात्याचे टीडीएस आदी वजा करून देय कर दहा हजार रुपयांपेक्षा जास्त येत असेल; तर अशा करदात्याला आगाऊ प्राप्तिकर (ॲडव्हान्स टॅक्स) भरणे गरजेचे आहे.

३१ मार्चपर्यंत भरलेला प्राप्तिकर हा ॲडव्हान्स टॅक्स म्हणूनच गणला जाईल. त्यामुळे, संबंधित करदात्यांनी आठवणीने ३१ मार्चपूर्वी (लागू असल्यास) आगाऊ प्राप्तिकर भरावा; त्यामुळे त्यांना अतिरिक्त व्याज भरावे लागणार नाही.

पॅन आणि आधार लिंक करणे

सरकारने गेल्या काही वर्षांपासून पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य केले असूनही अद्यापही असे अनेक करदाते आहेत, ज्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख तूर्त ३१ मार्च २०२३ आहे.

३१ मार्च २०२३ पर्यंत तुमचा पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक नसेल, तर तुमचे ‘पॅन कार्ड’ निष्क्रिय होईल. त्यामुळे पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक करणे हे अनिवार्य आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही तुमचे पॅन आणि आधार लिंक केले नसेल, तर १००० रुपयांचे चलन भरून आजच लिंक करून घ्यावे.

सुधारीत प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर यू)

आर्थिक वर्ष २०१९-२० म्हणजेच आकारणी वर्ष २०२०-२१ चे ‘आयटीआर यू’ फॉर्ममध्ये सुधारीत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. त्यामुळे संबंधित करदात्यांनी आठवणीने या संधीचा लाभ घ्यावा; कारण ३१ मार्च २०२३ नंतर आर्थिक वर्ष २०१९-२० चे सुधारीत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल होऊ शकणार नाही.

फॉर्म १२ बी भरणे

चालू आर्थिक वर्षात पगारदार करदात्याने त्यांच्या नोकऱ्या बदलल्या असतील, तर त्यांनी ‘फॉर्म १२ बी’ न विसरता भरावा; जेणेकरून तुम्हाला आधीच्या नोकरीद्वारे प्राप्त झालेला पगार लक्षात घेऊन, त्यानुसार तुमच्या चालू पगारातून करकपात केली जाईल. परिणामी तुम्हाला तुमचे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना अतिरिक्त प्राप्तिकर भरावा लागणार नाही.

प्रधानमंत्री वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्ज स्वीकारले जात आहेत. यामध्ये ७.४० टक्के निश्चित दराने १० वर्षे पेन्शन मिळत असून, ही योजना साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे.

म्युच्युअल फंड नामांकन (नॉमिनेशन)

तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर ३१ मार्चपर्यंत तुम्ही नामांकन सादर करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास गुंतवणूकदारांची गुंतवणूक गोठवली जाईल आणि त्यामध्ये ते व्यवहार करू शकणार नाहीत.

उच्च प्रीमियमचा आयुर्विमा

तुम्हाला उच्च प्रीमियमच्या आयुर्विमा पॉलिसीवर करसवलत मिळवायची असल्यास ३१ मार्चपूर्वी पॉलिसी करून घेणे हितकारक राहील. एक एप्रिल २०२३ नंतर घेण्यात येणाऱ्या वार्षिक पाच लाख रुपयांवरील प्रीमियमच्या आयुर्विमा पॉलिसींची मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम करपात्र होणार आहे. थोडक्यात, ३१ मार्च २०२३ पूर्वी वरील महत्त्वाची आर्थिक कामे करदात्यांनी करून घेणे अपेक्षित आहे; कारण आपल्या हातात आता जास्त दिवस शिल्लक नाहीत.