
Gold Silver Rate: लग्नसराईत सोन्या-चांदीचे भाव स्थिर, खरेदीसाठी चांगली संधी; जाणून घ्या आजचा भाव
Gold Silver Rate Today: मे महिन्याचा तिसरा आठवडा सोन्या-चांदीच्या भावात स्थिरतेसह सुरू झाला. तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल किंवा लग्नाच्या निमित्त खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
आज सराफ बाजारात 22 मे रोजी प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,530 रुपये, तर चांदीचा भाव 79,000 रुपये प्रति किलो आहे.
सराफा व्यापारी आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी सांगितले की, सोने आणि चांदीचे भाव स्थिर झाले आहेत. आज चांदी 79,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल. तर काल (रविवारी)ही चांदीचा दर असाच होता.
सोन्याचे भाव स्थिर:
मनीष शर्मा म्हणाले, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव काल संध्याकाळी 57,650 रुपये होता.
आजही भावात स्थिरता आहे. त्यांनी सांगितले की, रविवारी लोकांनी 60,530 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने 24 कॅरेट सोने खरेदी केले. आजही त्याची किंमत 60,530 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
हॉलमार्क (Hallmark)-
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.
सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
नवा नियम:
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.
मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.