
Income Tax: आयकर नियमानुसार घरात किती सोने आणि रोख रक्कम असायला हवी? काय सांगतो नियम
Income Tax: घरात किती रोकड ठेवता येईल? ठेवल्यास दंड आकारला जातो? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. अशा परिस्थितीत, घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा (Cash Limit at Home) काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जास्तीत जास्त किती रोख रक्कम घरात ठेवता येईल?
जर तुम्हाला नियम माहिती नसेल तर तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. घरात रोख रक्कम ठेवण्यासाठी आयकर नियम काय आहे ते जाणून घेऊया.
इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार तुम्ही तुमच्या घरात कितीही रोकड ठेवू शकता, पण जर ती तपास यंत्रणेने पकडली तर तुम्हाला त्याचा स्रोत सांगावा लागेल.
जर तुम्ही ते पैसे कायदेशीररित्या कमावले असतील आणि त्यासाठी पूर्ण कागदपत्रे तुमच्याकडे असतील किंवा आयकर रिटर्न भरले असतील, तर घाबरण्याची गरज नाही. परंतु आपण स्त्रोत सांगण्यास सक्षम नसल्यास, तपास यंत्रणा कारवाई करेल.
आयकर विभाग कधी दंड आकारतो?
जर तुम्ही रोखीचा हिशोब दिला नाही तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. जर तुमच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली.
यासोबतच, जर तुम्ही त्या रोख रकमेबाबत योग्य माहिती देऊ शकत नसाल, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
तुमच्याकडून वसूल केलेल्या रोख रकमेवर त्या रकमेच्या 37% पर्यंत कर आकारला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की तुमच्याकडे ठेवलेली रोख रक्कम नक्कीच जाईल आणि तुम्हाला त्यावरील 37% भरावे लागतील.
सरकारी नियमांनुसार विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेवू शकते, तर अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि विवाहित पुरुष 100 ग्रॅम सोने ठेवू शकतो. तसेच यासाठी संबंधित व्यक्तीला उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासणार नाही.
या मर्यादेत कोणी सोने ठेवल्यास आयकर विभाग सोने जप्त करणार नाही. मात्र, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात यापेक्षा जास्त प्रमाणात सोने ठेवले असेल तर त्याला त्याच्या स्त्रोताची माहिती द्यावी लागेल.
मोठे व्यवहार करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा:
घर घेताना, गाडी घेताना किंवा लग्नाच्या वेळी अनेकदा मोठे व्यवहार करावे लागतात. या प्रकारचा व्यवहार करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
एकावेळी बँकेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी पॅन कार्ड दाखवावे लागेल.
याशिवाय, जर तुम्ही एका वर्षात तुमच्या बँक खात्यात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली, तर तुम्हाला बँकेत पॅन आणि आधार कार्ड दाखवावे लागेल. जर तुम्ही बँकेतून 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर तुम्हाला टीडीएस प्रमाणपत्र द्यावे लागेल.
दुसरीकडे, 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेची रोख खरेदी आणि विक्री केल्यास ती व्यक्ती तपास यंत्रणेच्या रडारवर येऊ शकते.