
2000 Rupees Note: दोन हजारच्या नोटेवरुन कपिल सिब्बलांचे ट्विट चर्चेत; म्हणाले, मोदींनी भ्रष्टाचार...
2000 Rupees Note: RBI ने शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी चलनातून 2000 रुपयांची नोट बंद केल्याची घोषणा केली. तेव्हापासून राजकारण तापले आहे. याबाबत काँग्रेस आणि विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.
आता राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनीही ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की 2016 मध्ये 17.7 लाख कोटी रोख चलनात होती, जी 2022 मध्ये 30.18 लाख कोटी झाली.
मोदी सरकारला प्रश्न करत ते म्हणाले की, यामुळे देशात भ्रष्टाचार वाढला आहे का? यावर आता पंतप्रधान मोदी काय बोलणार?
यावर वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय का घेण्यात आला आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होईल की नाही हे सांगितले आहे.
2000 रुपयांच्या नोटा चलनातून का काढल्या जात आहेत?
वित्त सचिव टीव्ही सोमनाथन म्हणाले की, डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे 2000 रुपयांच्या नोटांचा वापर कमी झाला आहे. 2016 मध्ये नोटाबंदीनंतर ही नोट बाजारात आली होती.
परंतु आता बाजारात त्याचा ट्रेंड कमी झाला आहे. इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचा प्रसार लक्षात घेता, यापुढे उच्च मूल्याच्या नोटा बाळगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?
2000 रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
यावर अर्थ सचिव म्हणाले की, याचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालात असे म्हटले आहे की या नोटा मोठ्या प्रमाणावर व्यवहारासाठी वापरल्या जात नाहीत.