
आयुर्विमा आणि गुंतवणूक यांत नको गल्लत...
आयुर्विमा पॉलिसीकडे पहाण्याचा दृष्टिकोन कसा असावा आणि याचा निर्णय कसा घ्यावा; जेणेकरून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पैशाचा योग्य विनिमय होईल. कुटुंबासाठी आवश्यक तितके संरक्षक कवचही कसे मिळेल; याचबरोबर गुंतवणुकीमध्ये पुरेशी वाढही होईल, हे पाहिले पाहिजे. सर्वसाधारणपणे आयुर्विमा पॉलिसी ही करबचतीसाठी केलेली गुंतवणूक समजण्याची चूक केली जाते.
आयुर्विम्याचे महत्त्व
आयुर्विमा घेण्यामागील प्रमुख उद्देश हा एक भक्कम आर्थिक संरक्षक कवच निर्माण करण्याचा असला पाहिजे. कुटुंबप्रमुखाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक भविष्यावर होत असतो.
आपले जवळचे माणूस जाण्याने होणारी हानी कधीही भरुन न येणारी असली, तरी आयुर्विम्याचे कवच अशा आर्थिक अनिश्चिततेच्या प्रभावाची झळ कमी करते. त्यामुळे आयुर्विमा घेताना परंपरागत चुका टाळणे गरजेचे आहे. आयुर्विमा तुम्हाला विकला, तर जात नाही ना? तो तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहे का? हे जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे. विम्याचा उद्देश तुम्ही जिवंत असताना तुम्हाला श्रीमंत करण्याचा मुळीच नसतो.
हायब्रिड विमा योजना
एंडोव्हमेंट पॉलिसी, मनीबॅक, गॅरंटेड म्यॅच्युरिटी, अॅश्युअर्ड वेल्थ, गॅरंटेड इन्कम, यूलिप या सर्व पॉलिसी हायब्रिड विमा पॉलिसी आहेत, ज्या आपल्याला विमा आणि गुंतवणूक असे दोन्ही फायदे देण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही बाबतींमध्ये त्या अपयशी ठरतात. त्या ना धड आपल्याला पुरेसे विमाकवच देऊ शकतात;
ना चांगला परतावा देऊ शकतात. अशा हायब्रिड पॉलिसी साधारणपणे वार्षिक विमा हप्त्याच्या दहापट विमा संरक्षण देतात. त्यातून अनेकदा वाहनकर्जासारखे एखादे छोटे कर्जसुद्धा बंद होऊ शकत नाही, तर कुटुंबाच्या भावी काळामधील गरजा त्या कशा काय पूर्ण करणार? यांचा परतावादरही कमी असतो. अनेकवेळा तो महागाईच्या दराइतकाही नसतो.
टर्म इन्शुरन्स
टर्म इन्शुरन्स हा खऱ्या अर्थाने आयुर्विमा आहे. यासाठी एक निश्चित प्रीमियम दरवर्षी भरायचा असतो. यामध्ये कमी प्रीमियममध्ये जास्त विमा संरक्षण उपलब्ध होते. नोकरी किंवा व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेच टर्म इन्शुरन्स घेतला, तर कमी प्रीमियममध्ये जास्त रकमेचा विमा उतरवणे सहज शक्य असते. विम्याची गरज वाढली, तर अधिक रकमेचा विमा खरेदी करता येऊ शकतो.
आयुर्विमा आणि करबचत
अ) आयुर्विमा अजूनही करबचतीचा एक मार्ग समजला जातो. आर्थिक नियोजनासाठी त्याचा विचार केला जात नाही. याचे कारण म्हणजे करवजावटी; मात्र ‘८० सी’ अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीचा बहुतांश भाग हा पीएफ/ईपीएफ, पीपीएफ, गृहकर्जाची परतफेड या तरतुदींमध्ये वापरला जातो. त्यामुळे आयुर्विमा प्रीमियमच्या वजावटीसाठी फारसा वाव नसतो.
ब) जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींमध्ये करबचतीचा फायदा घेण्यासाठी अशा नॉन युलिप हायब्रिड पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल आहे, जो अर्थसंकल्पामधील नव्या बदलानुसार मर्यादित झाला आहे.
आयुर्विमा घेताना...
१) ज्या कंपनीकडून विमा घ्यायचा ती नावाजलेली आणि प्रतिष्ठीत असावी.
२) तिचे‘क्लेम सेट्लमेंट’ म्हणजेच दावे निकाली काढण्याचे प्रमाण चांगले असावे.
३) आपल्याला असलेले आजार; तसेच सवयी पारदर्शीपणे जाहीर कराव्यात.
अलिकडच्या काळामध्ये वैद्यकीय संशोधनामुळे लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढले आहे. मात्र याबरोबरच वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. तरुण लोकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसत आहे. अशावेळी पुरेसा टर्म इन्शुरन्स आणि आरोग्य विमा असणे केव्हाही चांगले.
(लेखक बँकिंग विषयातील तज्ज्ञ व आर्थिक नियोजनकार आहेत.)
(या विषयावरील सविस्तर लेख ‘सकाळ मनी’च्या एप्रिल २०२३ च्या अंकात वाचायला मिळेल.)