
इन्स्टीट्यूट ऑफ रिस्क मॅनेजमेंट (आयआरएम) इंडियाने ज्ञानविषयक भागीदारीसाठी रिलायन्स जिओ इन्फोकॉमसोबत सहकार्य करार केला.
Reliance Jio and IRM : रिलायन्स जिओ व आयआरएम यांच्यात सामंजस्य करार
मुंबई - इन्स्टीट्यूट ऑफ रिस्क मॅनेजमेंट (आयआरएम) इंडियाने ज्ञानविषयक भागीदारीसाठी रिलायन्स जिओ इन्फोकॉमसोबत सहकार्य करार केला आहे. त्याद्वारे टेलिकॉम उद्योगातील आपत्ती प्रतिबंधक व्यवस्थापनाचे महत्व अधोरेखित करून त्याचे उपाय योजले जातील.
कंपन्यांमधील आपत्ती प्रतिबंधक व्यवस्थापन क्षेत्रातील आयआरएम ही जगातील प्रमुख व्यावसायिक संस्था असून १४० देशांमध्ये त्यांचे यासंदर्भातील काम आहे. तर रिलायन्स जिओ ही देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. या भागीदारीतून दोनही कंपन्या देशभरात वेबिनार, चर्चासत्रे, गोलमेज परिषदा, बैठका याद्वारे कंपन्यांमधील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील माहितीचे आदानप्रदान करतील, असे रिलायन्स जिओ चे सचिन मुथा यांनी सांगितले.
आमचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. आता आयआरएमच्या सोबतीने जगातील सर्वोत्तम मानकांची भर त्यात पडेल, असे रिलायन्स जिओचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर रजनीश जैन म्हणाले. धोक्यांना तोंड देण्यास सज्ज अशा कंपन्यांची परिसंस्था तयार करून स्वयंपूर्ण भारत बनवण्याच्या आयआरएमच्या उद्दीष्ठांनुसारच हा भागीदारी करार करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
कंपन्यांचे कामकाज, उद्दीष्ठे तसेच अर्थकारण यातील धोके आधीच ओळखून त्यांना तोंड देण्याचे धोरण या पद्धतीत आखले जाते. आयआरएम ने यापूर्वीच ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन सह देशातील प्रमुख कंपन्यांशी असेच भागीदारी करार केले आहेत.
त्याचप्रमाणे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन आदी संघटनांशीही सल्गागार या नात्याने विचारविनिमय केला होता. वेगवेगळ्या कंपन्यांमधील आपत्ती व्यवस्थापन पद्धतींच्या माहितीचे आदानप्रदान करून सक्षम आपत्तीविरोधी प्रणाली निर्माण करण्यात ही भागीदारी महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असे आयआरएम इंडियाचे सीईओ हर्ष शहा म्हणाले.